पुणे जिल्हा : भावी आमदारांच्या उपक्रम चर्चेत ; हवेली तालुक्यात विविध उपक्रम

वाघोली : शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकींना काही महिन्याचा कालावधी राहिला असून याच निवडणुकीचे पडघम सध्या पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. इच्छुक उमेदवारांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे निवडणुकीची रंगत सध्या वाढत असल्याची चर्चा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे.
शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पूर्व हवेलीतील लोकसंख्येने मोठे असणाऱ्या वाघोलीच्या विविध समस्यांच्या शासन दरबारी पाठपुरावा आणि नागरिकांच्या समस्यांचे वेध घेणारा रन फॉर वाघोली हा उपक्रम राबवून वाघोली करांच्या समस्यांची जाणीव प्रशासनाला करून दिली आहे. आगामी काळात रन फॉर पुणे मनपा असा इशारा देखील देऊन पूर्व हवेली मध्ये या उपक्रमाने नवचैतन्य निर्माण केले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी नागरिकांच्या गाठीभेटीबरोबर हवेली तालुक्यामध्ये झालेल्या झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमांत उपस्थितीने अनेकांची मने जिंकली आहेत. भावी आमदार म्हणून हजारोंच्या जनसमुदायांसमोर त्यांचा उल्लेख टाळ्या आणि घोषणांनी नागरिकांनी अनुभवला आहे. प्रदीप कंद यांनी हजारोंच्या उपस्थितीमध्ये आपण निवडणुकीच्या रिंगणातले निश्चित उमेदवार असल्याचे वातावरण निर्माण केले आहेत. गट तट बाजूला ठेवून निर्माण केलेल्या वातावरणामुळे दहीहंडीतून कंदांनी हवेलीत आपली वेगळी प्रतिभा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कटके यांनी नागरिकांच्या आशीर्वादातून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची अनेक दिवसापासून ची आपली मनोकामना हजारोंच्या देवदर्शन यात्रा संपन्न करून व्यक्त केली आहे. शिरूर हवेली मधील अनेक नागरिकांचा देवदर्शन यात्रेमधील सहभाग वाढत असून सोशल मीडियावर या देवदर्शन यात्रेची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. देवदर्शन यात्रेच्या या उपक्रमाने कटके सध्या चर्चेत आले आहे.
वाघोलीवर विशेष लक्ष
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्वात जास्त लोकसंख्येचे आणि मतदार संख्या असलेले गाव म्हणून वाघोली गाव ओळखले जाते. या गावातील यापूर्वी विधानसभेसाठी अनेकांनी आपले नशीब आजमावले होते. हवेलीत या गावावर आपली मजबूत पकड निर्माण व्हावी आणि मतदारांनी आपल्याला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद द्यावे यासाठी इच्छुक उमेदवारांनी वाघोलीवर विशेष लक्ष दिले असून वाघोली मधून जास्तीत जास्त मताधिक्य कोण मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





