Pune District : सोलर कंपनीवर होणार कारवाई

बारामती : सोलर बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच, त्यांना सिमेंट, वाळू आणण्यास सांगणाऱ्या मे. रोटोमॅक सोलार कंपनीने केलेल्या कामाची महावितरणकडून पाहणी केली जाणार आहे. तोपर्यंत कंपनीचे 40 सोलर पंपाची कामे केल्याचे 1 कोटी 16 लाखाचे देयक अदा करणार नसल्याचे महावितरण कंपनीने स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये असे आवाहन महावितरणने केले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणतर्फे ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ सुरु आहे. तर यापूर्वी केंद्रसरकारच्या ‘कुसुम-बी’ योजनेतून सौर पंप आस्थापीत केले आहेत. अनुसुचित जाती व जमातीमधील शेतकऱ्यांना 95 टक्के तर इतर वर्गवारीतील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानातून सौर पंप मिळतात.
त्यासाठी तीन अश्वशक्तीला (एचपी) अनुसुचित जाती व जमातीकरिता 11486 रुपये, इतरांकरिता 22971 रुपये, पाच अश्वशक्तीसाठी अनुक्रमे 16038 रुपये व 32075 रुपये आणि 7.5 अश्वशक्तीला 22465 रुपये व 44929 रुपये भरावे लागतात. भरलेल्या रकमेतून सोलारपंप आस्थापित करण्यापासून त्याचे कार्यान्वयन, देखभाल दुरुस्ती आदींचा समावेश केला आहे. त्यामुळे कोटेशनच्या रकमे व्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जात नाही.
बारामती मंडल कार्यालयाशी संपर्क साधा
शेतकऱ्यांनीही अशी आगाऊ रक्कम कोणाला देऊ नये अथवा साहित्य आणून देऊ नये. त्यासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे तक्रारीची दखल न घेतल्यास बारामती मंडल कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत यांच्याशी संपर्क साधून तक्रार करावी. आलेल्या सर्व तक्रारींची महावितरणकडून चौकशी केली जाईल. सोलार कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार आहे.





