Pune District : शिरूरमध्ये प्लॅस्टिक विक्री करणार्यांवर कारवाई

शिरूर : शिरूर नगर परिषद व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने शिरूर शहरातील अवैध प्लास्टिक वापरणार्या व्यापार्यांवर कारवाई करत तब्बल 75 हजार रुपयांचा दंड तर 64 किलो प्लॅस्टिक जप्त केले असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.
शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 30) शिरूर नगरपरिषद हद्दीत असणार्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये दुकानांची तपासणी करून 120 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक बॅग आढळून आलेल्या दुकानांवर कारवाई करून एकूण 75 हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. तर 64 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
हा कारवाई शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे तसेच स्वच्छता मुकादम मनोज अहिरे, सागर कांबळे, सफाई कर्मचारी मयूर जाधव, गणेश शेंडगे, रमेश चव्हाण, वामन जाधव,राणी गव्हाणे, इंदुबाई मोरे, विद्या म्हस्के शितल घारु, काळूराम आसवले, पोलीस अंमलदार मनीषा फंड व रघुनाथ हळनोर यांच्या पथकाने केली आहे.





