पुणे जिल्हा : मोहितेंच्या पाठीशी राहून सर्वांगीण विकास साधा – रुपाली चाकणकर

महायुतीचे उमेदवार आमदार मोहितेंची आळंदीत सांगता सभा
आळंदी – काम करणार्या माणसाच्याबरोबर रहा. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पाठीमागे उभे राहून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचाराची सांगता सभा आळंदी येथे सोमवारी (दि. 18) दुपारी झाली. यावेळी चाकणकर बोलत होत्या. याप्रसंगी उमेदवार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, भाजपचे राम गावडे, गणेश सांडभोर, शिवसेनेचे जिल्हा संघटक अक्षय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, विनायक घुमटकर, अरुण चौधरी, दिलीप नाईकनवरे, वैभव घुमटकर, कांचन ढमाले, कल्पना गवारी, संध्या जाधव, वैशाली जाधव, मनीषा टाकळकर, हेमलता टाकळकर, सुभाष होले यांच्यासह महायुतीचे तालुक्यातील नेते, कार्यकर्ते, वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. राम गावडे म्हणाले की, तालुक्यातील मतदार सूज्ञ आहे. तोच निर्णय देणार आहे. इंद्रायणी नदीचा डी पी आर तयार होत आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवण्याचे नेतृत्व दादांकडे आहे. अजित दादांचा खेड तालुक्याला मंत्रिपदाचा शब्द खरा होणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे तालुक्यातील जनतेसाठी योगदान काय? समाजासाठी काही काम केले नाही. गटतट बाजूला ठेवा एकजुटीचे आमदार मोहिते यांच्या मागे उभे आहोत, ते बहुमताने निवडून येतील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी अक्षय जाधव, शांताराम भोसले, प्रकाश कुर्हाडे, दिलीप नाईकनवरे आदींची भाषणे झाली.
आळंदीकरांना दिलेले आश्वासन
आळंदीत भाजीबाजार अत्याधुनिक करणार. आळंदी परिसरातील गावांचा विकास साधणार, आळंदीला क दर्जाची महानगर पालिका होईल यासाठी प्रयत्न करणार. पार्किंगसाठी मोठा निर्णय घेतला जाईल. आळंदीतील पुलाशेजारी फुटपाथ करणार आणि विकासाची सात वचने मी पूर्ण करणार. लोकांना न्याय देणार. पायी प्रदक्षणा मार्गी करणार वारकयांसाठी वारकरी भवन बांधणार, वारकर्यांसाठी मोठे रुग्णालय उभारणार, आयटीआय आळंदीत करणार असे मंत्री झाल्यानंतर पुन्हा आळंदीत येईल आश्वासन मोहिते पाटील यांनी या सभेत दिली.
विरोधक दिलदार असला पाहिजे आमचे वैर नाही त्यांची राजकीय भूमिका वेगळी आमची वेगळी आहे मी भूमिका घेतली अजित पवार यांच्यासोबत राहण्याची आणि त्यांनीही शब्द दिला निवडून द्या मंत्रिपद देतो. तरीही विरोधकाला कमकुवत समजणार नाही. राजकारणात अनुभव नसला तर माणसे कसे राज्याचे आणि पक्षाचे वाटोळे करतात हे उद्धव ठाकरेंकडून शिकायला मिळाले. राज्य गमावले पक्षातील नेते सोडून गेले. शरद पवारांणी त्यांना मुख्यमंत्री केले मात्र कामकाज करता आले नाही. त्यांना मुख्यमंत्री पदाची माहिती नव्हती नाही. करोनाच्या काळात काहीच काम केले नाही. अडीच वर्षांत एकही फाईलवर सही केली नाही.
– दिलीप मोहिते-पाटील, आमदार





