पुणे जिल्हा : पुणे ते दिघीबंदर महामार्गावर अर्धवट कामामुळे वाढले अपघात

पौड : पुणे ते दिघीबंदर महामार्गावर सुर्वेवाडी ते धनवेवाडी दरम्यान असलेला रस्ता व पूल लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे. गेल्या तीन वर्षापासून येथील काम रखडल्याने हा रस्ता व पूल धोकादायक होऊ लागलेला असून, येथे सतत अपघात होत आहेत.तर वाहतूक कोंडीही या ठिकाणी होत आहे.
पुण्याहून कोकणात जाण्यासाठी ताम्हिणी घाट रस्ता मार्ग जवळचा आहे. सध्या या मार्गावर छोट्या मोठ्या वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र पौडजवळ असलेला दारवली येथील दारवली फाटा ते धनवेवाडी दरम्यानचा रस्त्याचे काम गेली तीन वर्ष रखडले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी यावर हरकत घेतल्याने हा रस्ता करत नाहीत. तसेच येथे असलेला पुलाचे काम झालेले नाही.
पुलावरही रस्ता एकदम छोटा झालेला असून समोरासमोर दोन गाड्या बसत नाहीत. तर पुलाच्या एका बाजूला मोठा खोल खड्डा आहे. या ठिकाणी सतत अपघात घडत असून बाजूला असलेल्या पंचवीस ते तीस फूट खोल खड्ड्यात वाहन पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून येथील काम लवकर होत नाही.
संबंधित शेतकरी रस्ता करून देत नाही. धोकादायक पुलावर रस्ता वाढवणे गरजेचे आहे. अनेक वाहने येथे समोरासमोर आल्याने एकमेकांना धडकत आहेत. तसेच याठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे. तरी हा धोकादायक पूल व रस्ता करण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
पुणे-कोलाड रस्त्यावरील अर्धवट कामे पूर्ण झाली नसल्याने रस्त्यावर वारंवार अपघात होतात. यामध्ये अनेकांचे जीव गमवावे लागले असून अनेक नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्याचे लवकरात लवकर काम पूर्ण नाही केल्यास महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे.
-राजू फाले, महाराष्ट्र स्वराज पक्ष मुळशी तालुका अध्यक्ष





