पुणे जिल्हा : बॅटरीवरच्या चारचाकीला अपघात

कवठे येमाई येथील घटना : चालक वाचला
सविंदणे- कवठे येमाई (ता. शिरूर) येथील बसस्थानकनजीक (दि.३१) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास बॅटरीवरच्या महिंद्रा चारचाकी गाडीला अपघात झाला. हा अपघात गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने व गाडीने वेग घेतल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले.
गाडी थेट दगडांच्या ढिगाऱ्यावरून समोरच असणाऱ्या काटेरी झाडाला धडकून झाडात अडकली. सुदैवाने या गाडीत मालक अमोल मुखेकर हे एकटेच होते. त्यांना मुक्का मार लागला. पण ते थोडक्यात बचावले.
याबाबत या गाडीचे मालक अमोल मुखेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच महिन्यांपूर्वी त्यांनी महिंद्रा कंपनीची बॅटरीवर चालणारी सुमारे अठरा लाख रुपये किमतीची गाडी खरेदी केली आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते या गाडीतून गावातील आपल्या दुकानात आले.
दरम्यान, कामानिमित्त बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी गाडी सुरु केली. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने गाडीने वेग घेतला अमोल यांनी ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण गाडीने प्रचंड वेग घेतल्याने गाडी दगडांच्या ढिगाऱ्यावरून थेट काटेरी झाडांना धडकून थांबली.
यात या गाडीचे मोठेच नुकसान झाले आहे. अमोल हे या घटनेत थोडक्यात बचावले आहेत. अपघाताबाबत कंपनीला कळविण्यात आले असून पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे आश्वासन कंपनीने अमोल मुखेकर यांना दिले आहे.





