Pune District : भोर तालुक्यातील धरणांत मुबलक पाणी

भोर : भोर तालुक्यातील भाटघर व नीरा देवघर धरणात मंगळवारी (दि.४) अनुक्रमे ७७.१२ तर, ६८.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. भाटघर धरणाच्या पॉवर हाऊसमधून १७६४ क्युसेक तर नीरा देवघर धरणाच्या पॉवर हाऊसमधून ७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
भोर तालुक्यातील पश्चिम भागात यंदा दमदार पाऊस झाल्याने दोन्ही धरणे ऑगस्टमध्ये भरली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही धरणात जास्तीचा पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ४ फेब्रुवारी रोजी भाटघर धरणात ६१.८२ टक्के तर नीरा देवघर धरणात ४८.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाटघर धरणात जवळपास १६ टक्के तर नीरा देवघर धरणात २० टक्के अधिकचा पाणीसाठा शिल्लक आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही धरणात ९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागील दोन महिन्यात भाटघर धरणातून २२ टक्के तर नीरा देवघर धरणातून ३१ टक्के पाण्याचा विसर्ग झाला आहे.
दोन्ही धरणात असलेला उपलब्ध पाणीसाठा पुढील चार महिन्यांसाठी योग्य नियोजन करून वापरणे आवश्यक आहे. दोन्ही धरणातील पाण्याचा भोर,बारामती, इंदापूर, पुरंदर, फलटण, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांसाठी उपयोग होत असतो.





