पुणे जिल्हा : थेऊरमध्ये कार -डंपरचा भीषण अपघात

लोणी काळभोर – थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गणेशवाडी एचपी पेट्रोल पंपाजवळ, अष्टविनायक मार्गावर कार व डंपरचा भीषण अपघात होऊन विक्रीकर अधिकार्यासह त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश प्रभाकर पवार (वय 62, रा. बकोरी फाटा, वाघोली) व अभिजीत सुरेश पवार (वय 36) असे मृत्यू झालेल्या पितापुत्रांची नावे आहेत. तर संदेश लक्ष्मणराव पवार (वय 33, रा वाघोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश पवार यांचा लहान मुलगा अनिकेत सुरेश पवार (रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अनिकेत पवार यांचे भाऊ अभिजीत पवार हे विक्रीकर निरीक्षक पदावर कार्यरत होते. अभिजीत पवार हे त्यांच्या कुटुंबासोबत अष्टविनायक मार्गावरून कारने चालले होते. त्यावेळी गाडीत दहा वर्षांचा मुलगा, दोन महिला आणि दोन पुरुष होते. थेऊरकडून थेऊर फाट्याकडे जात असताना, गणेशवाडी एच पी पेट्रोल पंपाजवळ त्यांची कार आली असता, त्यांच्या कारला समोरून येणार्या डंपरने जोरदार धडक दिली.
या अपघातात अभिजीत पवार व त्यांचे वडील सुरेश पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अभिजीत पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. तर सुरेश पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.





