पुणे जिल्हा : भरधाव वाहन होर्डिंग्जच्या सांगाड्यावर आदळले

रांजणगाव चौकात घटना : तिघे जखमी
रांजणगाव गणपती – येथील राजमुद्रा चौकात पहाटेच्या सुमारास अहिल्यानगरवरुन पुण्याच्या दिशेने आलेल्या भरधाव अवजड वाहनाने रस्त्यालगत असलेल्या बँनरच्या सांगाड्याला जोरदार धडक दिली. शेजारी असलेल्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले. यात तिघे जखमी झाले. माञ सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,अवजड वाहन हे रांजणगाव गणपती हद्दीतील राजमुद्रा चौकात नगर ते पुणे महामार्गालगतच्या होर्डिग्जला धडकून पुढील दुकानांमध्ये घुसले. यात तीनजण जखमी झाले. अक्षय कर्ण शेळके (शेळके वस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.
अपघातात जगदीश फवारा देवासी (रा. रांजणगाव गणपती), कुमारी प्रतीक्षा बाळासाहेब राठोड (वय दहा) कुशावर्ता बाळासाहेब राठोड (दोन्ही रा. रांजणगाव गणपती) हे जखमी झाले आहेत. वाहन चालक गोकुळ बबन शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास संतोष पवार हे करीत आहेत.





