पुणे जिल्हा : मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पूजा सोरतापवाडीत एकाविरोधात गुन्हा

लोणी काळभोर – व्यावसायिक स्पर्धेतून जुन्या मित्राचा मृत्यू व्हावा म्हणून स्मशानभूमीत अघोरी पूजा करून जादुटोणा करणा-या सोरतापवाडी (ता. हवेली) येथील एक जणाविरोधांत महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पेशाने वकील असलेल्या अॅड. सुरभी अमोल मानमोडे (वय ३१, रा. मांजरी ग्रीन वुडस, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, गणेश तात्यासाहेब चौधरी (रा. सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अॅड. सुरभी मानमोडे यांचे पती मानमोडे व चौधरी यांचा जमीन विकसनाचा व्यवसाय आहे. मागील १ वर्षापासुन त्यांचे व चौधरी यांचेमध्ये व्यवसायातील स्पर्धेतून वाद झाल्याने त्यांच्यामध्ये वितुष्ट आले होते. दोघेही मूळ एकाच गावातील असल्याने त्यांच्यामध्ये स्पर्धा होती. त्यातून त्यांच्यात नेहमीच किरकोळ वाद होत होते.
वर्षापासून ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. परंतू चौधरी हा मानमोडे यांना त्यांच्या मित्रांव्दारे त्याचे कधीही चांगले होणार नाही. मी चांगले होऊ देणार नाही अशा धमक्या देत होता. मानमोडे व त्यांचे मित्रांचा घंटीच्या चांडाळ चौकटी नावाचा एक व्हॉटसॲप ग्रुप आहे. त्यामध्ये मानमोडे, चौधरी व त्यांचे मित्र सहभागी आहेत.
दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी घंटीच्या चांडाळ चौकटी व्हॉटसॲप ग्रुपवर चौधरी याने एक व्हिडीओ पाठवला. तो व्हिडीओ सोरतापवाडी स्मशानभूमीमध्ये चितेला अग्नि देण्याचे ठिकाणी बनवलेला होता. त्यामध्ये गणेश चौधरी याने लिंबे कापून त्यामध्ये हळद, कुंकु व इतर पूजेचे साहित्य मिसळून त्याव्दारे अघोरी पूजा केल्याचे व त्याचा व्हिडीओ मोबाइलमध्ये तयार केला होता.
हा व्हिडीओ मानमोडे यांनी मोबाइलमध्ये पाहिला. परंतू त्यांना अघोरी पूजा चौधरी याने कोणासाठी केली याबाबत समजले नाही. ग्रुपमधील मानमोडे यांचे मित्रांनी त्यांना चौधरी याने ही पूजा जादुटोणा करुन मृत्यू घडवून आणण्याचे उद्देशाने घातली आहे, असे सांगितले. हे समजताच दोघांनी पोलीस आयुक्त कार्यालय, अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्हा यांचेकडे तक्रारी अर्ज केला. त्यानंतर याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.





