Pune District : राजगुरुनगरच्या प्रभाग रचनेवर 51 हरकती

जिल्हाधिकार्यांपुढे उद्या सुनावणी
राजगुरुनगर – राजगुरुनगर नगर परिषदेच्या 10 प्रभाग रचनेवर 51 हरकती प्राप्त झाल्या असून येत्या गुरुवारी (दि. 4) रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित असून, सदर निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग व नगरविकास विभागमार्फत प्रभाग रचनेसंदर्भातील सूचना व प्रभाग रचनेसंदर्भात राजगुरुनगर नगर परिषद प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना दि. 18 ऑगस्ट 2025 ते दि. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मागविण्यात आलेल्या होत्या.
या मार्गदर्शक सूचनेनुसार राजगुरुनगर नगरपरिषद मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून मंजुरी करिता जिल्हाधिकारी यांचेमार्फत नगर विकास विभागास सादर केला होता. राजगुरुनगर नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्यामार्फत मान्यता मिळवून सदर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना दि. 18 ते 31 ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आलेल्या होत्या.
राजगुरुनगर नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना मसुद्यावर दि. 31 ऑगस्टपर्यंत 51 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकती व सूचनांवर पुणे जिल्हाधिकारी याच्यापुढे समक्ष येत्या गुरुवारी दि. 4 रोजी सुनावणी होणार आहेत.
राजगुरुनगर नगरपरिषद हद्दीतील वाडा रोड विभाजनामुळे प्रभाग रचनेवर सर्वाधिक हरकती आल्या आहेत. तर अनुसूचित जाती प्रभाग राहुल चौक आणि वाडा रस्त्यावरील अनुसूचित जमाती प्रभागावर हरकती आल्या आहेत.
-अंबादास गर्कळ, मुख्याधिकारी राजगुरुनगर नगर परिषद





