पुणे जिल्हा : येळवळीत 46 झाडे तोडली

अतिसंवेदनशील वनक्षेत्र : वनविभागाकडून एकास 92 हजारांचा दंड
पोकलँडने डोंगावर बेकायदा उत्खनन
राजगुरूनगर – भीमाशंकर अभयारण्यातील येळवळी (भोमाळे, ता. खेड) गावच्या हद्दीत अति संवेदन वनक्षेत्रात 46 झाडे तोडल्याप्रकरणी मनोज भीकमचंद जैन (रा. वडगाव शेरी, माळवाडी पुणे) याला वनविभागाच्या वतीने 92 हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती खेडचे वन अधिकारी प्रदीप रौंधळ यांनी दिली.
भीमाशंकर अभयारण्यातील येळवळी (भोमाळे) गावचे हद्दीत अतीसंवेदन वन क्षेत्रात मालकी गट नं .117 मध्ये बेकायदेशीर मोठया प्रमाणात भोमा, लोत, चांदा, खारवत, बोडारा, धामण आशिंद, कोंभळ, पडगिर, भोगाडा, रामेठा या अनुपट्या आदी दुर्मीळ जातीच्या 46 झाडांची वृक्षतोड केली.
याशिवाय याच गटामध्ये मोठ्या प्रमाणात जेसीबी यंत्राच्या सहाय्याने डोंगराच्या तीव्र उतारावर 100 बाय 30 फूट बाय 15 फूट उंचीपर्यंत उत्खनन केल्याबदल भोरगिरी तलाठी यांनी बेकायदेशीर उत्खनन करून 45 हजार ब्रास माती, मुरुम खोदकामाचा पंचनामा तलाठ्याने खेड तहसीलदारांना अहवाल सादर केला आहे. अद्याप याबाबत कुठलाही दंड तहसीलदारांकडून आकारण्यात आला नाही.
हा भाग गावापासून खूप दूर घनदाट जंगलात असल्याने वन्य प्राणी, काजवे, पशू पक्षी यांचे वास्तव्य असते. भविष्यात बांधकामामुळे नदी प्रदूषणाचा मोठा धोका आहे. डोंगर खोदाईमुळे माळीण सारखी दुर्घटना होऊ शकते. याबाबत महसूल व वनअधिकारी जुन्नर विभाग हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार येळवळी ग्रामस्थांनी केली आहे.
येळवळी ग्रामस्थांसाठी शासनाने 75 वर्षांनंतर नुकताच पक्का रस्ता केला आहे. या रस्त्याने खोदाई कामासाठी चेन असलेले पॉकलँड मशीन चालवत नेल्याने रस्ता खराब झाला. बांधकामासाठी येथे वाळूच्या मोठया 30 टनाच्या हायवा ट्रक जाणार असल्याने हा रस्ता पूर्णपणे खचून जाण्याची शक्यता असल्याची ग्रामस्थानी तक्रार केली आहे .
अभयारण्याच्या हद्दीत मालकी जागेत बांधकाम आगर इतर परवानग्या आमच्या आखत्यारीत नाही. यासाठी महसूल व वन विभागाची स्वतंत्र कमिटी आहे. त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सचिव उपवनसंरक्षक जुन्नर हे असतात. अशा बांधकामाबाबत कमिटी निर्णय घेते.
– वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर
परवानगी घेतलेली नाही
मनोज भिकमचंद जैन यांनी ही जागा विकत घेतली आहे. त्यांच्या संस्थेसाठी येथे बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामासाठी जिल्हाधिकारी नगररचना विभाग यांची बांधकाम परवानगी येण्यात आलेली नाही.
येळवळी (भोमाळे, ता. खेड) : भीमाशंकर अभयारण्य हद्दीत डोंगरावर पॉकलंड मशिनने केलेली खोदाई.





