पुणे जिल्हा : श्री विघ्नहर कारखान्याचा 3200 रुपये बाजारभाव जाहीर

42वी वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन सत्शयील शेरकर यांची माहिती
ओझर – श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने मागील सन 2023-24 गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला 3200 रुपये प्रति मे. टन विनाकपात बाजारभाव जाहीर केला आहे. त्यामुळे सभासद, ऊस उत्पादक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा विश्वास चेअरमन सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाविषयी शेरकर त्यांनी सविस्तर माहिती दिली.
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची 42 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 30) कारखान्याचे चेअरमन शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेचे कामकाज होण्यापूर्वी श्री विघ्नहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. निवृत्तीशेठ नामदेव शेरकर व स्व. सोपानशेठ नामदेव शेरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
मागील वर्षी इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले. तसेच 40 वर्षापूर्वीच्या मशिनरीचा मेंटेनन्स मोठया प्रमाणावर वाढलेने या वर्षी कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला.
हा प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असल्याचे सत्यशील शेरकर यांनी यावेळी सांगितले. सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय उपस्थित सभासदांनी उत्स्फूर्तपणे एकमताने मंजूर केले. कारखान्याच्या कामकाजाविषयी बोलताना अनेक सभासदांनी चेअरमन सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाचे कौतुक करताना चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ठ व पारदर्शक कामकाज सुरू असल्याचे सभासदांनी बोलून दाखविले. यावेळी बहुसंख्य सभासदांनी प्रश्न विचारुन सभेच्या चर्चेत सहभाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी योग्य उत्तरे दिल्याने सभासदांचे समाधान व्यक्त केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले. दुःखवट्याचा ठराव सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी मांडला तर उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.
शेतकर्यांचा सन्मान
मागील गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, एकरी 111 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी, जास्तीत जास्त ऊस तोडणी व ऊस वाहतूक करणारे कंत्राटदार, हार्वेस्टरने जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे कंत्राटदार, एकरी 100 टनापुढील उत्पादन घेणारे शेतकरी यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी एकरी 136 मे. टन ऊस उत्पादन घेणारे उल्हास जेजुरकर यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कारखाना पदाधिकार्यांचा सत्कार
कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ-कोऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्लीचा गळीत हंगाम 2022-23 साठीचा उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार कारखान्यास मिळाल्याबद्दल सभासदांच्या वतीने अभिजित बढे व विकास चव्हाण यांनी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.





