Pune District : टेमघर धरण दुरूस्तीसाठी 315 कोटी उपलब्ध; सागर मारणे यांच्या मागणीला यश

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या भागातील रहिवासी व भाजयुमोचे तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली होती. नुकतीच टेमघर धरण दुरूस्तीसाठी 315 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाल्याने सागर मारणे यांच्या मागणीला मोठे यश आले आहे.
टेमघर धरण हे मुळशी तालुका आणि पुणे शहरसाठी खूप महत्त्वाचे असे धरण आहे. या धरणाचे काम 1998 ला सुरु झाल्यानंतर 17 ते 18 वर्षे अपूर्ण अवस्थेत होते. काम पूर्ण झाल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागली.
महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर मंत्री गिरीष महाजन यांनी धरणाची पाहणी केली होती. त्यावेळी धरण दुरूस्तीसाठी शंभर कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला होता. माञ झालेले काम धरणाची गळती रोखू शकले नाही.
राहिलेले काम जर पूर्ण केले नाही तर एवढा खर्च करून केलेले काम पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. तरी धरणासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी सागर मारणे यांनी केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेमघर धरण दुरूस्तीसाठी 315 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.





