Pune District :वृद्धेला डाला घेऊन ३ किमी पायपीट

रस्ता नसल्याने दवाखान्यात नेण्यासाठी कुतरओढ : म्हसर बुद्रुकमध्ये संताप
हिरडस मावळ – भोर तालुक्यातील म्हसर बुद्रुक गावातील शिंदेवस्ती येथील जाईबाई शिंदे या वृद्ध महिलेला सकाळी ९ वाजता पॅरालिसिसचा झटका आला. मात्र, रस्ता नसल्याने महिलेला डालात टाकून तीन किलोमीटर चिखल तुडवत पायपीट करत तब्बल दीड तासांनी म्हसर बुदुक गावात आणले. तेथून खासगी गाडीने भोर रुग्णालयात आणले. स्वातंत्र्याला ७८ वर्ष झाली तरीही अद्याप दुर्गम डोंगरी गावात रस्त्याच्या सुविधा नाहीत. ही शोकांतिका आहे.
म्हसर बुदुक गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोगरात २५ घरांची शिंदेवस्ती आहे. म्हसर बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश बबन शिंदे यांची आज्जी जाईबाई कोंडीबा शिंदे (वय ९० वर्ष) यांना सकाळी ९ वाजता पॅरालिसिसचा झटका आला. मात्र, रस्ता कच्चा असून पावसाळ्यात वस्तीत कोणत्याही प्रकारचे वाहन जात नाही. त्यामुळे शिंदेवाडी ते म्हसरबुद्रुक गावापर्यंत ३ किलोमीटर अंतर असल्यामुळे नागरिकांनी वृद्धेला डालात ठेवून भर पावसात चिखल तुडवत दीड तासाने गावात आणले.
मात्र, गावात दवाखाना नसल्याने खासगी गाडीने महिलेला भोर रुग्णालयात आणावे लागले. स्वातंत्र्याला ७८ वर्ष झाली तरीही तालुक्यातील भाटघर धरण, नीरा देवघर धरण भागातील दुर्गम डोंगरी काही गावांना, रायरेश्वर किल्ला वरची धानवली अशा अनेक ठिकाणी रस्त्याची सुविधा नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात कोणीही आजारी पडल्यास, सर्पदंश झाल्यास, महिला प्रसुतीवेळी डाल किंवा डोलीत टाकून पायपीट करत रुग्णाला आणावे लागते. यात रुग्णाचा जीव जाण्याची भीती आहे. मात्र, याकडे प्रशासानाचे दुर्लक्ष होत आहे.
पायपीटशिवाय दुसरा पर्यायच नाही
म्हसर बुद्रुक येथील शिंदेवस्ती येथे २५ घरे असून रस्ता देखील कच्चा आहे. दर पावसाळ्यात रस्ता बंद होतो. त्यामुळे पावसाळ्यात दळणवळणाची सुविधा नसल्याने कोणीही आजारी पडल्यास रुग्णाला घेऊन पायपीट करावी लागते. त्यामुळे हा रस्ता करावा, अशी मागणी म्हसर बुद्रुकचे सरपंच एकनाथ म्हसुरकर यांनी केली आहे.





