पुणे जिल्हा : काऱ्हाटी परिसरातील १७ गावांवर पाणीटंचाईचे सावट

नाझरे धरण कोरडे पडल्याने भीषणता
काऱ्हाटी – बारामती तालुक्यासह काऱ्हाटी परिसरात जोरदार पाऊस न पडल्याने नदी, नाले, पाझर तलाव कोरडेठाक पडले आहेत. १७ गावांना मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा करणारे जेजुरी येथील नाझरे धरणात आता काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात भीषण स्थिती उद्भवली आहे.
यावर्षी दमदार पाऊस न झाल्याने कऱ्हा नदीला अद्याप एकही पूर आला नाही. त्यामुळे या धरणात पाणी न आल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे.
दरम्यान पावसाळा होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी सुद्धा परिसरात व इतर ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने पावसाची हीच स्थिती कायम सुरु राहिल्यास धरणातून पाणीपुरवठा करणे शक्य नाही.
नाझरे जलाशयामध्ये आता फक्त मृतसाठा शिल्लक असल्याने पुढील काळात १७ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनिल घोडके, शाखा अभियंता





