पुणे जिल्हा : हिवरे कुंभारमध्ये 16 वर्षीय युवतीचा विवाह

शिक्रापूर पोलिसांत दीड वर्षांनी बालविवाह प्रकरणी गुन्हा
ससूनमध्ये प्रसूती झाल्याने प्रकार उघड
शिक्रापूर – हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथे ऑक्टोबर 2023 मध्ये 16 वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह केल्याची घटना घडली असून अल्पवयीन युवतीने नुकतेच एका बाळाला जन्म दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी युवतीच्या आई, वडिलांसह सासू सासरे व पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रभागा सोपान लोंढे, भाऊ सतीश सोपान लोंढे, भावजय धनश्री सतीश लोंढे (सर्व रा. हिवरे कुंभार ता. शिरूर) यांच्यासह पीडितेचे पती रवी छबु शेलार, सासू सुनिता छबु शेलार, सासरे छबु महादेव शेलार, नणंद सोनाली विशाल पंचरस (सर्व रा. बेलवंडी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध बालविवाहासह आदी गुन्हे दाखल केले आहे.
तर महिला पोलीस हवालदार नीता रामदास चव्हाण (वय 32 रा. शिक्रापूर ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. हिवरे कुंभार येथील चंद्रभागा लोंढे या महिलेने तिच्या 16 वर्षीय युवतीचा श्रीगोंदा तालुक्यातील सुप्रिया शेलार यांच्या रवी शेलार या मुलाशी 2023 मध्ये बालविवाह करुन दिला होता, त्यांनतर युवती श्रीगोंदा येथे पतीच्या घरी राहत होती. नुकतेच या युवतीने ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिल्याने युवती अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने ससून रुग्णालयाने शिक्रापूर पोलिसांना कळवले.
पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, विशाल देशमुख, महिला पोलीस हवलदार नीता चव्हाण, पूजा सावंत यांनी ससून रुग्णालयात जात पीडित अल्पवयीन युवतीचा जबाब घेतला असता युवतीच्या आई वडिलांनी व सासू सासर्यांनी संगनमत करुन युवतीचा युवती अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील ऑक्टोबर 2023 मध्ये हिवरे कुंभार येथे बालविवाह केल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करत आहे.





