Pune District : विद्यार्थ्यांचे १४ प्रकल्प नीती आयोगाकडे सादर

लोणी काळभोर : शालेय विद्यार्थ्यांमधील उद्यमशीलता आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठातील अटल इनक्युबेशन सेंटर (एआईसी) द्वारे अटल टिंकरिंग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राम (एटीएल-एसआईपी) राबविला जात असून, चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र तथा छत्तीसगढमधील ९ शाळांचे १४ प्रकल्प मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठविले.
अंतिम मंजुरीनंतर सहभागी चमू आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह डसॉल्ट सिस्टम्स यांच्या साह्याने त्यांचे प्रकल्प विकसित करू शकणार आहेत.
एआईसी -एमआईटी एडीटी इनक्यूबेटर फोरमच्या माध्यमातून ९ शाळांमधील १५ संघांची निवड अटल टिंकरिंग लॅब स्टुडंट इनोव्हेटिव्ह प्रोग्राममध्ये करण्यात आली. सर्व संघाचे अंतिम ऑनलाइन प्रकल्प सादरीकरण आणि परीक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते.
एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा डॉ मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ऑनलाइन सादरीकरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एआयसी-एमआयटीएडीटी इनक्यूबेटर फोरमचे व्यवस्थापक कार्यक्रम नीलेश पांडव होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिषेक राठी आणि मनोज देशपांडे यांनी काम केले. उद्योजिका आणि पुणे येथील फूड मँक कन्सल्टंट्सच्या संचालिका भाग्यश्री म्हात्रे, सायंटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ विपणन अभियंता विजय वाढणे, मास एंटरप्रायझेस, पुणेचे संचालक मंगेश चव्हाण आणि एमआईटी विद्यापीठाच्या आयटी विभागाचे अविनाश चौधरी यांनी परिक्षक म्हणून मूल्यमापन केले.
अपघात प्रतिबंधक यंत्रणा (स्मार्ट रोड), जलकुंभापासून सक्रिय चारकोल निर्मिती, आपत्ती निर्देशक, पथ विक्रेत्यांसाठी स्ट्रीट मार्ट, मानसिक चार्ट बोर्ड, एलपीजी गॅस लीक शील्ड, डायबेलाझल, स्वयंचलित कृषी उपकरणे क्दी विषयांवर प्रकल्प सादर केले. यासाठी एआईसी-एमआयटी एडीटीसह त्यांच्या विज्ञान शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले.





