पुणे जिल्हा : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 135 जनावरांचा मृत्यू

खेड तालुक्यात मार्च 2023 ते 24 या वर्षभारातील घटना
108 प्रकरणांमध्ये साडेआकरा लाखांची भरपाई
राजगुरुनगर – मार्च 2023 ते 1 एप्रिल 2024 या अर्थिक वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्यात खेड तालुक्यातील 135 जनावरांचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या वतीने 108 प्रकरणांमध्ये शासन नियमानुसार 11 लाख 50 हजार 941 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली तर भिवेगाव आणि धुवोली येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दोन व्यक्तीना 50 लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती राजगुरूनगर वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप रौंधळ यांनी दिली.
खेड तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्यात 71 शेळ्या, 20 बोकड, 26 कालवडी, 2 पारडे, 6 मेंढ्या, 2 घोडे आणि 8 गो-हे यांचा मृत्यू झाला. तालुक्यात वन्यप्राण्यांनी शेतीपिकांचे नुकसान केले होते. नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव वनविभागाकडे दाखल केले होते दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
चास ते बुरसेवाडी परिसरात खरिपातील भुईमूग, सोयाबीन आणि मका पिकाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान झाले होते. 62 शेतकर्यांनी वनविभागाकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार वनविभाने दखल घेत वन कर्मचा-यांनी शेतीपिकांचे घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. त्याचे प्रस्ताव करून वनविभागाने पुढील कारवाही साठी वरिष्ठ कार्यालयात पाठवले होते. या सर्व 62 नुकसानग्रस्त शेतक-यांना 2 लाख 55 हजार 82 रुपयांची मदत वनविभागाने दिली आहे.
वनघरे, जठार कुटुंबीयांना 50 लाखांची मदत
भीमाशंकर अभयारण्य परिसरातील भिवेगाव येथे लक्ष्मण वनघरे आणि धुवोली येथे अजय जठार या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. शासन नियमानुसार संबंधित कुटुंबाला घटना झाल्यावर काही दिवसांत वनविभागाच्या वतीने 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली होती तर उर्वरित त्यांच्या वारसाच्या नावे पाच लाख पाच वर्षांसाठी व 10 लाख 10 वर्षांसाठी बँकेत ठेव (एफडी) ठेवण्यात आली आहे.





