Pune District : १३ अल्पवयीन मुली पालकांच्या ताब्यात

शिरूर : शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने संवेदनशील व कौतुकास्पद अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जानेवारी ते मे या कालावधीत शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा यशस्वी शोध घेण्यात आला. त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.
सर्व गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी तत्परता, तांत्रिक विश्लेषण, खबऱ्यांची मदत व सखोल तपासाच्या माध्यमातून ही कामगिरी पार पाडली. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी हे मिशन पूर्ण केले. याच कालावधीत शिरूर हद्दीतून ४५ महिला व ३५ पुरुष बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदविल्या होत्या.
या प्रकरणांची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या आदेशानुसार एक विशेष मिसिंग शोध पथक तयार केले. पथकात हवालदार संपत खबाले, अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे, महिला पोलीस अंमलदार सारिका माळी यांचा समावेश होता. पथकाने एक महिन्यात कसून शोधमोहीम राबवून सर्व ८० नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवले.
संपूर्ण मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शन लाभले. मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार नाथसाहेब जगताप, संपत खबाले, पोलीस अंमलदार, विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड, महिला अंमलदार भाग्यश्री जाधव, मोनीका वाघमारे, प्रतिभा देशमुख, स्नेहल होळकर, गोदावरी धंदरे, परवीन पप्पुवाले, गीता सुळे, सारिका माळी यांनी सहभाग घेतला.





