Pune District : हृदयविकाराचे लहानग्यांमध्ये प्रमाण वाढतय

शेलपिंपळगाव : बातमी समस्त पालकांची चिंता वाढवणारी असून पुण्यात नववीत शिकणार्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. हा मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाल्याचं बोललं जातंय. वैद्यकीय विभागाकडून याची शहानिशा करणे सुरू आहे. राजगुरूनगरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आलीये. बुधवारच्या सकाळी शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु झाला. तेंव्हा नववीत शिकणार्या स्नेहा होलेला अस्वस्थ वाटू लागलं, मग अचानक तिला चक्कर ही आली. शिक्षकांनी तातडीनं तिला रुग्णालयात हलवले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
स्नेहाचा मृत्यू नेमका कशाने झालाय? याबाबतची शहानिशा खेड तालुका वैद्यकीय विभागाकडून केली जातीये, अशी माहिती वैद्यकीय प्रमुख विलास मानेंनी दिली. तर हृदयविकाराचे लहानग्यांमध्ये प्रमाण वाढत आहे. याकडे वैद्यकीय तज्ज्ञ सुचित्रा खेडकर यांनी लक्ष वेधलेे अन् पालकांना मोलाचे सल्ले ही दिलेत. अलीकडच्या काळात लहानग्यांमध्ये जन्मताच हृदयाचे विकार आढळून येताहेत. तो लक्षात आला नाही, किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करून वेळेत उपचार घेतले नाहीत. तर ही बाब पाल्याच्या जीवावर बेतणारी ठरू शकते.
स्नेहाच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण
केवळ चक्कर आल्यानं स्नेहाचा मृत्यू कसा काय होऊ शकतो? नक्कीच तिला वेगळा काहीतरी आजार असू शकतो? पण तो नेमका कोणता? खरंच तिला हृदयविकाराचा झटका आला का? स्नेहाच्या पालकांना याबाबत काही कल्पना होती का? इतक्या लहान वयात खरंच हृदयविकाराचा झटका येतो का? येत असेल तर त्याची नेमकी कारणं काय आहेत? ती कारणे नेमकी कशी ओळखायची? त्यातून या लहानग्यांचा जीव कसा वाचवायचा? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेत, जे पालकांची चिंता वाढवणारे आहेत.
आहार पद्धतही सुद्धा चिंतेची बाब
हल्लीची पिढी ही मोबाइलमध्ये गुरफटलेली आहे, परिणामी मैदानी खेळ आणि व्यायामापासून ती दूर असते. आहार पद्धत ही सुद्धा चिंतेची बाब आहे, पारंपरिक आहाराऐवजी अलीकडे जंक फुडला प्राधान्य दिलं जात असल्याचे ही निदर्शनास आले आहे. यामुळे मुलांमध्ये स्थूलपणा वाढत चाललाय. परिणामी लहान वयातचं हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. पालकांनी ही बाब लक्षात घेऊन खबरदारी घेणं गरजेचे आहे. योग्यवेळी योग्य ते उपचार घ्यायला हवेत. शाळा आणि घरी मुलांनी मैदानी खेळासह व्यायामाला प्राधान्य द्यायला हवे. जंक फूड टाळून हेल्दी फुडवर भर देणे गरजेचे आहे. तेव्हा हृदयविकारासह इतर आजार नियंत्रणात राहू शकतात, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुचित्रा खेडकर यांनी दिलाय.





