इंदापूर शहराला 1 कोटी 8 लाखांची गॅस शवदाहिनी मंजूर

रेडा (प्रतिनिधी) : इंदापूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 ग्रामविकास कार्यक्रम भांडवली खर्च अंतर्गत 1 कोटी 8 लाख 64 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
इंदापूर शहरावर मागील चौदा महिन्यापासून कोरोनाचे तीव्र संकट गोंगावत आहे. या संकटात अनेकांची प्राणज्योत मालवली.एखाद्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वृक्षतोड झाल्याने लाकडाची कमतरता तर वाढलेले इंधणाचे दर या समस्यांसह रात्री अपरात्री अंत्यविधी पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची ही मोठी समस्या निर्माण होत होती. आता गॅस शवदाहीनी मंजूर झाल्याने या सर्व समस्यांचा समूळ नाश होणार आहे.
इंदापूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविणे या कामासाठी 1 कोटी 8 लाख 64 हजार रकमेचे अंदाजपत्रक तयार त्यानुसार इंदापूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविणे या कामासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या दि. 22 मार्च 2021 रोजीच्या सह 80 लाख 38 हजार तसेच कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग क्र.1 पुणे यांचेकडून प्रस्तुत कामाचे सिव्हिल वर्कसाठी 28 लाख 26 हजार असे एकूण 2 कोटी 8 लाख 64 हजार च्या कामास जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. लवकरचं ही गॅस शवदाहीनी कार्यन्वित होऊन कोरोनाच्या संकटात इंदापूर करांना अंत्यविधीकामी मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या पैशांची बचत होणार
सध्या इंदापूर स्मशानभूमीत एक कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करण्यासाठी लाकडे, पीपीई किट, डिझेल व अंत्यविधी करणारे कष्टकरी यांचे मानधन असे प्रत्येक अंत्यविधीला सहा हजार रुपये खर्च, कोरोनाने मयत झालेल्या रूग्णांकडून घेतले जातात. गॅस शवदायिनी लवकर झाल्यास कोरोनाने मयत होत असलेल्या रुग्णांच्या नातेचाईकांचे भरपूर आर्थिक खर्च वाचणार आहे. त्यामुळे ही गॅस शवदायिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इंदापूर शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मयत रुग्णाचा अंत्यविधी करण्यासाठी मयत व्यक्तीच्या नातलगांना यासाठी येणारा अधिक असून अशा दुख:द प्रसंगी हा खर्च त्या कुटुंबास पेलवणारा नाही. इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस कडून इंदापूर शहरात अंत्यविधी साठी गॅस शवदाहिनी तात्काळ बसवण्यात यावी अशी अग्रणी मागणी करण्यात येत होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांकडे हा मुद्दा लावून धरला होता. अखेर ढवळे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, राष्ट्रवादी काँग्रेससह नगरपरिषद व शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याने शहराध्यक्ष ढवळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसह जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे आभार मानले आहेत.





