राजगडच्या पायथ्याशी विस्मय फाउंडेशनचा ‘प्रकाशमान’ उपक्रम; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

गुंजवणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे (ता. वेल्हे) परिसरात ‘विस्मय फाउंडेशन’ने शिक्षणासोबतच आता उर्जेच्या बाबतीतही स्वावलंबी पाऊल उचलले आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात विजेअभावी खंड पडू नये, यासाठी संस्थेच्या वतीने गुंजवणे येथे १७ किलोवॅट आणि करंजावणे येथे ३ किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे.
गेल्या १३ वर्षांपासून दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाचे कार्य करणाऱ्या विस्मय फाउंडेशनने स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीनुसार “Let Life be an Offering” हे ब्रीद सार्थ ठरवले आहे. या परिसरातील वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते, तसेच शेतीसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून संस्थेने हे प्रकल्प उभारले आहेत.
शेतीला पाणी आणि घरांना मोफत वीज
या सौर ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर शेतीसाठी पाणी उपसण्याकरिता केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, गावातील घरांनाही यातून मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे. “लाईट गेल्यावर विद्यार्थी अंधारात राहू नयेत आणि त्यांचा अभ्यासाचा वेळ वाया जाऊ नये, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे,” अशी माहिती विस्मय फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. समीर घोले यांनी दिली.
सामाजिक संस्थांचे सहकार्य
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प MIT-WPU आणि SLB लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने साकार झाला आहे. या मदतीबद्दल संस्थेने या दोन्ही संस्थांचे विशेष आभार मानले आहेत.
मोफत गुरुकुलचा आधार
विस्मय फाउंडेशनच्या वतीने नसरापूर येथेही मोफत गुरुकुल चालवले जाते. यामध्ये सध्या २० विद्यार्थी आधुनिक ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांवर आधारित शिक्षण घेत आहेत. दुर्गम भागातील पिढी सक्षम करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.vismayfoundation.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“दुर्गम भागातील वीज आणि पाण्याचा प्रश्न सोडवल्यास मुलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, याच भावनेतून आम्ही हे सौर प्रकल्प उभारले आहेत.”
– समीर घोले (अध्यक्ष, विस्मय फाउंडेशन)





