पुणे : जम्मू -काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील व्यावसायिक कौस्तुभ गनबोटे (५६, रा. कोंढवा) यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी त्यांच्या पत्नी संगीता त्यांच्यापासून दूर होत्या. त्यांनी शोधाशोध केल्यावर कौस्तुभ जखमी अवस्थेत सापडले. त्यांना मोठा धक्का बसला, त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, त्यांना अर्धा तास कोणतीच मदती मिळाली नाही. त्यातच मधुमेह असल्याने त्यांचा रक्तस्राव थांबलाच नाही. कौस्तुभ गनबोटे हे शनिवारी पुण्यातून विमानाने जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मित्र संतोष जगदाळे हे देखील होते. काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. गोळीबार सुरू होता, तेव्हा संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे व इतर पर्यटक हॉटेलच्या बाहेर बसले होते. गोळीबाराचा आवाज झाल्याने आरडाओरडा सुरू झाला. पर्यटक धावपळ करू लागले. त्यामुळे दहशतवाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात संतोष जगदाळे यांच्या खांद्याजवळ, तर कौस्तुभ गनबोटे यांच्या कमरेच्या खाली गोळी लागली. कौस्तुभ गनबोटे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. शुगरचा त्रास असल्याने रक्त थांबत नव्हते. जवळच असणारे संतोष जगदाळे यांना देखील मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने गनबोटे घाबरून गेले होते. गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही. गनबोटे यांचा त्यांच्या पत्नीने शोध घेतला. त्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांना तसे पाहून त्यांच्या पत्नीलाही मोठा धक्का बसला. हल्ल्याची माहिती मिळतच त्यांचा गनबोटे यांचा मुलगा कुणाल हा तात्काळ नातेवाईकांसह विमानाने काश्मिरला रवाना झाला. छोट्या व्यवसायातून मोठी भरारी कौस्तुभ गनबोटे यांचा मागील ३० वर्षांपासून गनबोटे फरसाण हाउस या नावाने व्यवसाय होता. अगदी छोट्याशा व्यवसायातून आज त्यांनी गनबोटे फरसाण हाउस हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. त्यांना एक मुलगा असून, त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला होता. अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबावर शोककळा पसरली आहे.