Pune News : पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे पडले महागात; पुण्यात चोरट्यांनी घर उघडून लांबवला दीड लाखांचा ऐवज
Pune News : पुण्यातील धायरी परिसरात चोरट्यांनी घराबाहेर लपवलेली चावी शोधून दीड लाखांचे दागिने चोरले आहेत.

Pune News : सदनिकेच्या दरवाजाच्या परिसरातील पादत्राणे ठेवण्याची जाळीत चावी ठेवणे एका महिलेला महागात पडले आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात चोरट्यांनी चावी चोरून सदनिकेचे कुलूप उघडले. कपाटातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले.
या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या धायरीतील रायकर मळा परिसरात असलेल्या श्री हाईट्स इमारतीत राहायला आहेत.
१६ मार्च रोजी त्या सकाळी दहाच्या सुमारास सदनिका बंद करुन कामाला गेल्या. त्यांनी सदनिकेची चावी पादत्राणांच्या जाळीत ठेवली होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या कामावरुन घरी आल्या. तेव्हा सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी सदनिकेची चावी चोरल्यानंतर शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.
वर्षभरापूर्वी सॅलिसबरी पार्क परिसरात अशाच प्रकारची एक घटना घडली होती. चोरट्यांनी सदनिकेतून ३० लाखांचे दागिने लांबविले होते. नागरिकांनी पादत्राणांची जाळी, तसेच सदनिकेच्या दरवाज्याच्या परिसरात चावी ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





