पुणे : पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज मार्केट यार्डातील ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी वर्तविला आहे. पितृपंधरवड्यात गवार, भेंडी, कारली, चवळीच्या शेंगा, देठ, आले, अळूची पाने, काकडी या भाज्यांना दरवर्षी मागणी असते. या भाज्यांची मागणी वाढल्यामुळे दर कमी होण्याची शक्यता नाही. उलट मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक न झाल्यास आणखी दर वाढू शकतात. सद्य:स्थितीत वाढलेल्या मागणीमुळेच घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात पितृपंधरवड्यात लागणार्या भाज्यांची आवक पुणे जिल्हा आणि विभागातून होत आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने विक्रीसाठी बाजारात दाखल होत असलेल्या भाज्यांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळेही चांगला दर मिळत आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले. पेरू, केळी, डाळिंबालाही मागणी पितृपंधरवड्यात जशी विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी वाढते, तशीच काही फळांनाही वाढते. पेरू, केळी आणि डाळिंबाला मागणी वाढल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात या तीनही फळांच्या दरात वाढ झाली आहे. पेरू आणि केळीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात डाळिंबाचा प्रतिकिलोचा भाव १०० ते ३०० रुपये, केळी ४० ते ६० रुपये डझन, तर पेरूचा किलोचा भाव दर्जानुसार २० ते ५० रुपये असल्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. किरकोळ बाजारातील भाज्यांचे किलोचे दर – गवार १२० रुपये – भेंडी ८० रुपये – कारली ८० रुपये – चवळी ८० रुपये – काकडी ८० रुपये -अळूची पाने २० रुपये गड्डी