Pune : पावसामुळे मक्याच्या कणसाला मागणी

पुणे – पाऊस आणि भाजलेले मक्याचे कणीस यांच्यात एक अतूट नाते आहे. त्यामुळे मुसळधार असो की रिमझिम पाऊस, अशा ओलावलेल्या वातावरणात भटकंती करत मक्याचे भाजलेले कणीस खाण्याचा आनंद काही औरच आहे. सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लवल्याने पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. त्यामुळे मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. परिणामी घाऊक बाजारात किलोच्या दरात ३ ते ५ रूपये रूपयांनी वाढ झाल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली.
गेल्या आठवड्यापासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. त्यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत. शहर आणि परिसरातील पर्यटन स्थळी पर्यटकांची संख्या वाढल्याने मक्याच्या कणसाला मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोला १५ ते २२ रुपये भाव मिळत आहे. हा भाव मागील वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. बाजारात रविवारी १५०० गोणींची आवक होते.
इतर दिवशी ८०० ते १००० गोणी दाखल होतात. बारामती, खेड, मंचर, नारायणगाव, नाशिक, अहिल्यानगर येथून ही आवक होत आहे. जूनपासून मक्याच्या कणसाची आवक सुरू झाली आहे. शहर, उपनगरातील किरकोळ विक्रेत्यांसह लोणावळा, महाबळेश्वर, विविध किल्ले, धबधब्याच्या ठिकाणाहून कणसांची खरेदी केली जाते. सध्याची कणसाची आवक हिवाळ्यापर्यंत कायम राहणार असल्याचेही सुपेकर यांनी नमूद केले.





