Pune : कामात दिरंगाई चालणार नाही!

पुणे – महसूल विभागातील कामकाजात गती आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व १५४ मंडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामकाजाचे थेट आदेश दिले. “तुमच्यावर कारवाई करण्याची इच्छा नाही, पण काम वेळेत झाले पाहिजे,” असे स्पष्ट करत त्यांनी वेळेवर आणि प्रभावीपणे काम करण्याची तंबी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक होते. या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी , उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार उपस्थित असतात. आतापर्यंत फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत पहिल्यांदाच सर्व मंडल अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले.
या बैठकीत रखडलेली विकास कामे, नागरिकांच्या समस्या, आणि नवीन उपाययोजनांवर चर्चा केली जाते. या बैठकीमुळे महसूल विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि वेग येण्याची शक्यता आहे, यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक सुलभ होतील.
दप्तरांची तपासणी होणार
जिल्हाधिकारी डुडी यांनी सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाची आणि दप्तरांची पुढील 30 दिवसांत तपासणी केली जाईल असे जाहीर केले. यामध्ये काहीही चुकीचे आढळल्यास थेट कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. “माझी कोणावरही कारवाई करण्याची इच्छा नाही, पण प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
– नागरिकांना विविध प्रकारचे फेरफार आणि ७/१२ चे उतारे वेळेत द्या.
– ई-हक्क आणि ई-चावडी प्रणालींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवा.
– जिल्ह्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करा.
– पाणंद रस्ते खुले करा.
– मागील सहा महिन्यांचे पुनर्वसन संकलन रजिस्टर तयार करा
– सर्व रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून द्या.





