Pune: परीक्षा शुल्कमाफी माहिती भरण्यास दिरंगाई

पुणे – पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांत शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्यासाठीची माहिती भरण्यास दिरंगाई होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळण्यासाठी महाविद्यालयांनी माहिती सादर करावी, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिल्या आहेत.
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त व दुष्काळसदृश्य भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने पुणे विद्यापीठाने दुष्काळग्रस्त भागातील राहत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागविली होती. त्यासाठी लिंक खुली करण्यात आली होती.
पण, पात्र असणाऱ्या काही विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करुन देण्यास आलेल्या पोर्टलवर भरली नसलयाचे निदर्शनास आले आहे. परीक्षा शुल्क माफीचा लाभ न मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादीही विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे.
सद्यस्थितीत अद्यापही काही महाविद्यालयांनी आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झालेली नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन परीक्षा शुल्क सवलतीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी सर्व माहिती तातडीने भरुन द्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.





