Pune: सर्वांचे हित व मानसिकता लक्षात घेऊनच निर्णय; २५ ऑगस्टला पुन्हा बैठक

पुणे : गणेशोत्सव सुरू व्हायचा बाकी असतानाच विसर्जन मिरवणुकीवरून निर्माण झालेला वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हस्तक्षेप करत अंतिम निर्णय २५ ऑगस्टला घेतला जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेश मंडळांच्या बैठकीत दिली. “सर्वांचे हित आणि मानसिकता लक्षात घेऊनच निराकरण होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस शहरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्रकुमार डुडी, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अखिल मंडई व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळांनी मानाच्या गणपतींनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर इतर साठ मंडळांनी सकाळी सात वाजता मिरवणूक काढण्याचा पवित्रा घेतला आणि पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली. त्यावर पोलिसांनी तोडगा काढावा, अशी मागणी झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून बालगंधर्व रंगमंदीरात ही बैठक बोलविण्यात आली होती.
पोलीस आयुक्त म्हणाले…
– सर्व मंडळे आमच्यासाठी समान, कोणी मोठे-लहान नाही.
– महिला सुरक्षेसाठी विशेष पथके तैनात केली जातील.
– अवैध दारूविक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
– वादग्रस्त देखावे, शॉर्टसर्किट किंवा अडचणी टाळाव्यात.
– प्रत्येक मंडळाने स्वतःचे स्वयंसेवक नेमावेत.
‘बिर्याणीचा विषय आला कुठून?’
बैठकीत काहींनी प्रमुख मंडळांना बिर्याणी, तर इतरांना फक्त चहा-बिस्किटे दिल्याचा आरोप केला. त्यावरही आयुक्त कुमार यांनी खुलासा केला. हा बिर्याणीचा विषय कुठून आला? एका पोलिस कर्मचाऱ्याने निवृत्ती निमित्त सहकाऱ्यांना बिर्याणी दिली होती. त्यावरून गैरसमज पसरवला गेला. बेछूट बोलू नका. असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले.
काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कार्यालयात मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठराविक मंडळांना बिर्यांनी दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
काय आहेत मंडळांच्या मागण्या?
– मानाच्या गणपतींना वेगळा न्याय, इतरांना वेगळा असा भेदभाव नको.
– महापालिका, एमएसईबी व पोलिसांमध्ये समन्वयासाठी स्पष्ट यंत्रणा असावी.
– महाराष्ट्र शासनाने दिलेल्या राज्य उत्सव दर्जाचे नियोजन महापालिकेने स्पष्ट करावे.
– बायोटॉयलेटऐवजी विद्यमान स्वच्छतागृहे व्यवस्थित ठेवावीत.
– महापालिकेने किमान दोन-तीन बैठका घेऊन अडचणी ऐकाव्यात.
– ढोल पथकांची संख्या व वेळेवर नियंत्रण हवे.
– पूर्व भागातील रस्ते बंद करू नयेत.
– विसर्जन मिरवणुकीचा प्रश्न राजकारण न करता मार्गी लावावा.





