PUNE: डेक्कन परिसर यंदाही पाण्याखाली जाणार

पुणे – पावसाळ्यात अचानकपणे एकाच वेळी मोठा पाऊस होऊन मागील दोन वर्षांपासून डेक्कन परिसरात पूरस्थिती उद्भवत आहे. हा पूर रोखण्यासाठी महापालिकेने तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून नवीन पावसाळी जलवाहिनी टाकली आहे. शेवटच्या टप्प्यात हे कामच चुकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डेक्कन भागात यंदाच्या पावसाळ्यातही पूरस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत.
डेक्कन येथील मेट्रो स्थानकाखालीच या १६०० मि.मी. व्यासाच्या पावसाळी वाहिनीसमोरच नदीपात्रातील सांडपाण्याची ट्रंक लाइन आडवी आल्याने हे काम बंद आहे. त्यावर तोडगा म्हणून महापालिकेने या दोन्ही लाइनखाली चेंबर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे पावसाच्या पाण्याला अडथळा होणार असल्याने पूर स्थितीचे सावट आहे.
डेक्कन परिसर तसेच फर्गसन रस्त्यावरून आलेले पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने दगडी डक्ट हाॅंगकाॅंग लेनच्या खालील बाजूने टाकत तो डेक्कन बसस्थानक शेजारल रस्त्यावरून नदीपात्रात सोडला होता. मात्र, महामेट्रो प्रशासनाने या बसस्थानकाजवळचे प्रवेशद्वार तसेच नदीपात्रात मेट्रो स्थानकासाठीचे खांब या पावसाळी वाहिनीतच उभे केले. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पावसाळी पाण्याचा निचरा होत नसल्याने जंगली महाराज रस्ता, फर्गसन काॅलेज रस्ता, आपटे रस्ता तसेच डेक्कन परिसरात पूरस्थिती उद्भवत आहे.
तांत्रिक अडचणीमुळे पुराचे सावट
यापूर्वी केलेल्या कामातील चूक लक्षात आल्यानंतर महापालिकेने नवीन जलवाहीनी टाकली. ती मेट्रो स्थानकाखालून नदीपात्रात सोडण्यात आली आहे. मात्र, जेथे पावसाळी जलवाहिनी टाकण्यात येत आहे, त्यासमोरच सांडपाण्याची ट्रंक लाइन आली आहे. या दोन्ही जलवाहिन्या जमिनीखाली एकाच अंतरावर असल्याने तेथे टी तयार झाला आहे.
ही चूक सुधारण्यासाठी पालिकेने पावसाळी वाहिनीसाठी चेंबर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये या दोन्ही वाहिन्या समोर आल्या, तिथे सांडपाणी वाहिनीवरून आणि खालून पाणी पडून पुढे नदीकडे जाईल, असे पालिकेचे नियोजन आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसाळी वाहिनीतून येणारे पाणी आडव्या ट्रंक लाइनमुळे अडणार असून, रस्त्यावरील पाण्याचा निचरा होणार नाही. परिणामी, मोठा पाऊस झाल्यास पुन्हा पूर पूरस्थिती उद्भवेल.
परतीचे दोरही कापले
महापालिकेस आता ही चूक दुरूस्त करायची असल्याने नवीन पावसाळी वाहिनी पुन्हा बाहेर काढून ती पाच ते सहा फूट खोल टाकावी लागणार आहे. मात्र, हा मार्गही पालिकेने बंद केला आहे. ही नवीन जलवाहिनी ज्या रस्त्याखालून टाकली, तो रस्ताही काॅंक्रीटीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी काम करण्यासाठी महापालिकेस हा रस्ता खोदावा लागणार आहे. आधीच उशीर झाल्याने वाहतूक तसेच कामाचा खर्च वाढत असल्याने महापालिकेस हे काम लवकरच संपविण्याची घाई झाली आहे.





