Pune Daund Local Train: पुणे-दौंड मार्गावर अजूनही लोकल का नाही? समोर आले ‘हे’ धक्कादायक कारण
Pune Daund Local Train: पुणे-सोलापूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणानंतरही डिझेल इंजिनवरच धावत्यात डेमू गाड्या; रेल्वेचे वर्षाला तब्बल १३ कोटींचे नुकसान.

Pune Daund Local Train – पुणे- सोलापूर लोहमार्गावरील विद्युतीकरणाचे काम २५० कोटी खर्चूनही साडेसहा वर्षे लोटली. मात्र, या लोहमार्गावर अद्याप इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू नाही. दौंड- पुणे मार्गावर जुन्या डिझेल इंजिनवर चालणाऱ्या डेमू गाड्या धावत आहेत. गाड्यांच्या फेऱ्यांसाठी रेल्वेला दररोज ३ लाख २८ हजार रुपयांचे डिझेल जाळावे लागत आहेत. वर्षभरात हा खर्च १२ कोटी ९८ लाख रुपयांपर्यंत आहे.
दुसरीकडे, विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतरही इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू न झाल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वे बोर्ड, राज्य सरकारच्या नगरविकास विभागामधील प्रशासकीय दिरंगाईमुळे तयार पायाभूत सुविधा धूळखात पडल्या आहेत. दररोज २० हजार प्रवाशांना अपुऱ्या सुविधांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दररोज हजारो नोकरदार, कामगार, विद्यार्थी या मार्गावरून प्रवास करतात.
मात्र, केवळ आठ डब्यांच्या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी कोंबले जात असल्याने प्रवास त्रासदायक ठरत आहे. एक्स्प्रेस आणि मालगाड्यांना प्राधान्य देण्यासाठी या लोकल गाड्यांना अनेकदा स्थानकांवर दीर्घकाळ थांबवले जाते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून संतापात भर पडत आहे.
दरम्यान, पुणे- सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत तसेच पुणे- शिरूर मार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या कामांमुळे महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी दौंड- पुणे इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू करणे हा सर्वात प्रभावी पर्याय असल्याचे प्रवासी संघटनांचे मत आहे.
आम्हाला आश्वासने नकोत, सुरक्षित प्रवास हवा
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गाड्यांमध्ये स्वतंत्र महिला डबा नसल्याने अनेक महिलांना गर्दीतून प्रवास करताना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही समाजकंटकांकडून चालत्या गाड्यांमध्ये जुगार खेळणे, दादागिरी करणे आणि प्रवाशांना धमकावण्याचे प्रकारही वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रेल्वे पोलीस, प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे या दादागिरीला आळा बसत नसल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे. रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या सुविधामुळेही प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे “आम्हाला आश्वासने नकोत, तर सुरक्षित प्रवास हवा” अशी संतप्त प्रतिक्रिया महिला व नियमित प्रवाशांकडून उमटत आहे.
प्रवासी आंदोलनाच्या तयारीत
रेल्वे प्रवाशांच्या या प्रश्नांची दखल घेत राज्यसभेचे खासदार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची नवी दिल्लीत भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. निवेदनात दौंड- पुणे मार्गावर तातडीने इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू करणे, गाड्यांचे डबे ८ वरून १२ करणे, महिलांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देणे, रेल्वे पोलिसांची गस्त वाढवणे, चौपदरीकरण आणि दौंड जंक्शन विकास आराखड्याचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. महामार्गावरील आगामी वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रवासी समस्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन याबाबत तातडीने निर्णय घेणार की प्रवाशांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




