Central Railway: पुणे-मुंबई प्रवास होणार सुपरफास्ट! बदलापूर-कर्जत नवीन रेल्वे लाईनला केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मध्य रेल्वे विभागातील बदलापूर- कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या लाइन प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील दिला. मंजूर झालेल्या या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे २ हजार ७८१ कोटी रुपये आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
बदलापूर-कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या लाइन ३२ किलोमीटरच्या या नवीन दुहेरी मार्गात ८ मोठे पूल, १०६ लहान पूल, १ रोड अंडरब्रीज आणि ६ स्थानकांचा समावेश आहे. साधारण १३२४ कोटींचा हा प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्या ५०-५० भागीदारीमध्ये राबवला जाणार आहे. या मार्गाच्या विस्तारामुळे कल्याण-कर्जत विभागातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
मुंबई उपनगरीय नेटवर्कवरील लाखो दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या सर्वाधिक फायदा पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार असून, अतिरिक्त मार्गामुळे अधिक गाड्या धावू शकतील आणि प्रवास वेळेतही घट होण्याची शक्यता आहे.औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या या पट्ट्यात मालवाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
दरवर्षी ७.२ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक शक्य होणार आहे. यामुळे ४१ लाख लिटर डिझेलची बचत आणि सुमारे ४६ कोटी रुपयांची वार्षिक खर्चात घट अपेक्षित आहे. पर्यावरणीय लाभ म्हणून दरवर्षी २ कोटी किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होणार असून, हे जवळपास ८ लाख झाडे लावण्याइतके प्रभावी ठरणार आहे.





