PUNE : ससूनमधील रुग्णांना ‘व्हर्च्युअल रिऍलिटी’द्वारे दगडूशेठ बाप्पाचे दर्शन

पुणे – आजारपणामुळे रुग्णालयातील आयसीयु विभाग आणि वॉर्डमधील बेडवर झोपलेल्या रुग्णांना “व्हर्च्युअल रिऍलिटी’च्या माध्यमातून “दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन आणि आरती करण्याचा आनंद घेता आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त “व्हर्च्युअल रिऍलिटी स्टार्टअप-डिजिटल आर्ट व्हीआरई’ या माध्यमातून पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयूमधील रुग्णांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. डिजिटल आर्ट व्हीआरईचे संस्थापक संचालक अजय पारगे यांची ही संकल्पना आहे.
“व्हर्च्युअल रिऍलिटी’ ते रुग्ण प्रत्यक्षपणे उत्सवमंडपात आहेत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे. अयोध्या श्रीराम मंदिरात गणरायाचे दर्शन घेण्याचा अनुभव रुग्णांनी घेतला. तसेच गुरुजींसोबत आरती करीत असल्याचा आनंद देखील रुग्णांना मिळत आहे.
यावेळी अनेक रुग्णांना आनंदाश्रू अनावर झाले. आपण लवकर बरे व्हावे, यासाठी रुग्णांनी प्रार्थना देखील केली. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, यामुळे रुग्णांना वेगळी उर्जा व समाधान मिळत आहे. अजय पारगे म्हणाले, हे रुग्ण इतर भक्तांच्या शेजारी उभे राहून जप करताना आणि अभिषेक करतानाही पाहतील. त्यांना बसल्याजागी बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.





