पुणे | पांढऱ्या कोटाआडून काळे “कार’नामे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ललित पाटील ड्रग्स प्रकरणात ससून रुग्णालयातील पांढऱ्या कोटाच्या आत असलेल्या डाॅक्टरांचे “काळे’ कारनामे करणारे चेहरे समोर आले. यापूर्वीचे किडनी प्रत्यारोपण प्रकरण असो की, उंदीर चावा प्रकरण. यामध्ये ससून रूग्णालयाची प्रतिमा पूर्णत: मलिन झाली.
आता नुकत्याच घडलेल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी दोन डाॅक्टरांना अटक करण्यात आली. त्यासाठी डाॅक्टरांनी “मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याचा’ प्रकार समोर आला. त्यामुळे ससून हे रुग्णालय आहे, की आरोपींना पाठीशी घालण्याचे “सरकारी’ केंद्र आहे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात डाॅ. अजय तावरे आणि सीएमओ डाॅ. श्रीहरी हरळनोर यांच्यासह एका कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
यापूर्वीची सर्व प्रकरणे ताजी असताना, आता आणखी एका दृष्कृत्यात डाॅक्टरांचा सहभाग समोर आल्यमुळे या डाॅक्टरांना पैशांची नशा चढली आहे का? मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी किती खाणार? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मागील दोन वर्षांत घडलेल्या घटनांमुळे डाॅक्टरांच्या “मलिदा गॅंग’चे पितळ पुन्हा-पुन्हा उघडे पडत आहे. आरोग्य विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालणे आवश्यक आहे.
गरीब रुग्णांसाठी इतकी तत्परता का नाही?
बड्या बापाच्या पोरासाठी ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणा कामाला लागते, ससूनसारख्या रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचारी तत्परता दाखवतात; तीच तत्परता एखाद्या गरीब रुग्णासाठी का दाखवत नाहीत? त्यांच्याकडून मलिदा मिळत नाही म्हणूनच का? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.
ससूनमध्ये गेल्यावर तास न् तास रांगेत उभे रहावे लागते. अॅडमिशन असेल, तर संपूर्ण दिवस जातो. मात्र, बोटावर मोजण्याइतके काही कर्मचारी आणि डाॅक्टर वगळता, अन्य डाॅक्टर व कर्मचारी रुग्णाने एखादा अपराध करूनच रूग्णालयात आला अशी वागणूक दिली जाते.
तर दुसरीकडे अपराध केलेल्या व्यक्तीला “व्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळते. हे सर्व चित्र एकीकडे असताना ज्यांच्याकडे रुग्णालयाची प्रशासकीय जबाबदारी आहे, ते मात्र पैसे घेऊन “मॅनेज’ होतात इतके विदारक चित्र ससून रुग्णालयासारख्या ठिकाणी आहे.
पैसे…पैसे आणि फक्त पैसे
“दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र पाहिजे…?’ मग द्या पैसे, “शासकीय नोकरीपूर्व आवश्यक आरोग्य तपासणीतील त्रुटी दूर करायच्यात?’ मग द्या पैसे, “मेडिकलची फायल क्लियर करायचीय?’ मग द्या पैसे, अशा एक ना अनेक कामांसाठी ससून रुग्णालयात शिपायापासून वरच्या स्तरापर्यंत पैशांची मागणी होत असल्याच्या घटना अनेकवेळा उघडकीस आल्या. त्यामध्ये काहींवर कारवाईही झाली.
यापूर्वीचे ड्रग्स प्रकरण असो, किंवा आताचे कल्याणीनगर अपघात प्रकरणात लाखो रुपयांची “डील’ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ससूनमधील डाॅक्टरांना पैशांची चटक लागल्याची परिस्थिती वारंवार समोर आली आहे.
डाॅ. तावरेने पोलिसांनाच मागितली होती लाच
मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेटमध्ये डाॅ. तावरे याचे नाव समोर आले होते. त्यातूनच त्याच्याकडील अधीक्षक पदाचा पदभार काढून, निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ते प्रकरण शांत होत नाही; तेच ललित पाटील प्रकरण घडले. या घटनेत त्याचे नाव नसले तरी, ससून रुग्णालयातील डाॅक्टरांच्या काळ्या कारनाम्याची खरी पोलखोल झाली.
त्यानंतर रुग्णांना उंदीर चावा प्रकरणात पुन्हा डाॅ. तावरे याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यावेळी शवविच्छेदन अहवालात फेरफार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. त्यानुसार झालेल्या चौकशीनंतर ही कारवाई झाली. त्याचबरोबर शवविच्छेदन अहवालात तावरेने पोलिसांकडे लाच मागितल्याची चर्चा समोर आली.





