Pune : धोकादायक साकव पूल पाडणार

पुणे – मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी पूल पडल्यानंतर जिल्ह्यातील सर्व साकव पुलांचे स्ट्रकचरल आॉडिट करण्यात येणार आहे. त्यानंतर जे धोकादायक साकव पूल असतील, ते तातडीने पाडण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
रविवारी दुपारी कुंडमळा येथील लोखंडी पूल पडल्यावर ५१ लोकांना वाचविण्यात आले. या घटनेत ४ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील ३८ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यातील पुलांच्या स्थितीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
याविषयी जिल्हाधिकारी म्हणाले, की एप्रिलमध्ये झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पुलांचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऑडिट केले आहे का, कोणते पूल धोकादायक आहेत, याचा अहवाल मागविला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत अहवाल आल्यावर धोकादायक साकव पूल पाडून टाकले जातील. अशा पुलांचा वाहतूक, तसेच पायी जाण्यासाठीही वापर होणार नाही. त्यामुळे दुर्घटना टाळता येतील.
अहवाल १५ दिवसांत
कुंडमळा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आदी विभागांचे अधिकारी असणार आहेत. समिती सर्व बाजूंचा विचार करून आपला अहवाल सादर करणार आहे. यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. अहवालामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.





