Pune: धरणे काठोकाठ, पाणीसाठा ८७ टक्के

प्रभात वृत्तसेवा
पुणे : घाटमाथ्यावर मुसळाधार पाऊस होत असल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. चारही धरणांत ८७ टक्के पाणीसाठी आहे. धरणासाखळीतील सर्वात मोठे वरसगाव धरण ९१ टक्के भरल्याने वीज निर्मितीसाठी ६०० क्यूसेकचा पाणी विसर्ग सुरू आहे. मुठा नदीत शनिवारी दुपारी १६७२ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू केला. यामुळे एकूण २२७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत होत आहे. हे पाणी थेट खडकवासला धरणात येत असल्याने तेथून दुपारी ३ वाजता १७१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या भागाला दक्षतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह, घाटमाथ्यावर मुसळाधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाटयाने वाढ होत आहे. खडकवासला भरल्यानंतर आता सर्वाधिक साठवण क्षमता असलेले वरसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणाची साठवण क्षमता १२.५० टीएमसी असून सध्या तेथे ११.५० टीएमसी पाणी आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाने खबरदारीचा उपाय म्हणून वीज निर्मिती केंद्र सुरू केले असून त्यासाठी ६०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. साडेदहा टीएमसी साठवण क्षमता असलेले पानशेत धरणाचा पाणीसाठी शनिवारी ८८ टक्के झाला असून धरणात सध्या ९.२३ टीएमसी पाणीआहे. त्यामुळे येथूनही पाणी सोडले जाण्य़ाची शक्यता आहे.
वरसगाव, पानशेत धरणातून सोडलेले पाणी खडकवासला धरणात येते. गेल्या वर्षी मोठया प्रमाणात पाणी सोडल्याने शहरातील अनेक भागात पूरस्थिती उद्भवली होती. त्यामुळे पावसाच्या अंदाजानुसार यंदा पाटबंधारे विभागाकडून आधीच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. तेथे केवळ ५४ टक्के पाणी आहे. मात्र, पावसाचे प्रमाण वाढल्यास तसेच वरसगाव, पानशेतचा विसर्ग वाढल्यास खडकवासला धरणातील पाणी विसर्ग वाढेल. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या भागात दक्षतेचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरस्थीती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज ठेवली आहे.
सध्याचा धरणातील पाणीसाठा
-खडकवासला – ५४ टक्के
-पानशेत – ८८ टक्के
-वरसगाव – ९१ टक्के
-टेमघर ; ८० टक्के
एकूण : ८७ टक्के





