Pune Cyber Crime: सायबर रॅकेटचा पर्दाफाश! ॲमनोरा मॉलमधील कॉल सेंटरवर पोलिसांची धाड..धक्कादायक कारनामा उघड
Pune Cyber Crime: कॉल सेंटरमध्ये ५ अल्पवयीन मुला-मुलींचे शोषण; बेकायदेशीर कामासाठी वापर केल्याने आयोजकांसह १२ जणांवर गुन्हे दाखल.

Pune Cyber Crime – ॲमनोरा आणि फुरसुंगीत सुरू असलेल्या एका कथित हायटेक सायबर फसवणूक रॅकेट पुणे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बनावट कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती आणि एका पिस्तूलसह जिवंत काडतुसे जप्त केली.
हडपसर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, ॲमनोरा चेंबर्स, ॲमनोरा मॉल आणि फुरसुंगीतील कार्यालयांमधून ॲपेक्स ॲचिव्हर आणि जे.के.एल इंडिया सोल्यूशन प्रा.लि. या नावाने कॉल सेंटर चालविले जात होते. येथून नागरिकांना विविध वेबसाईटद्वारे ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले जात होते. विश्वास संपादन करून आर्थिक व्यवहार झाल्यावर फसवणूक केली जात असे.
पोलिसांंनी सांगितले की, १० जून रोजी दुपारपासून सुरू झालेल्या या कारवाईत शहर पोलिसांच्या विविध शाखांतील २०० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. सायबर तज्ज्ञ, फॉरेन्सिक टीम आणि तांत्रिक पथकांच्या मदतीने एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. यावेळी पोलिसांना हार्ड डिस्क, एसएसडी, सर्व्हर, ऑटो डायलर मशीन शेकडो सिम कार्ड, सीम बॉक्स सेटअप , लॅपटॉप, मोबाईल, डीव्हीआर,
सीसीटीव्ही डेटा ग्राहकांना फसवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉल स्क्रिप्ट , विविध बँक खात्यांची कागदपत्रे, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने सापडले. तपासातील माहितीनुसार, मुख्य आरोपी संतोष वेंजणेकर याच्यावर कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांचे आधार, पॅन कार्ड घेऊन त्यात फेरफार करून सिम कार्ड मिळवणे आणि बनावट बँक खाती उघडण्याचा गंभीर आरोप आहे. या खात्यांचा वापर आर्थिक व्यवहार आणि पैसे वळविण्यासाठी करण्यात येत असल्याचा संशय आहे.
अल्पवयीनांचे शोषण? –
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कॉल सेंटरमध्ये पाच अल्पवयीन मुला-मुलींना कामावर ठेवल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बेकायदेशीर स्वरूपाचे काम करून घेतल्याने गुन्हा दाखल केला आहे.
मास्टरमाइंडचा शोध
या प्रकरणात संतोष वेंजणेकरसह १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वेबसाईट मालक म्हणून अमित मजेटीया आणि भागिरथ पांड्या यांची नावे समोर आली आहेत. या नेटवर्कमागे आणखी मोठे आर्थिक रॅकेट आणि देशभरातील व्यवहार असल्याची शक्यता तपास यंत्रणांना वाटते.




