सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा ‘Digital Arrest’ ; वर्षभरातील आकडेवारी आली समोर

पुणेः शहरात सायबर क्राईमचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. लोकं मोठ्या प्रमाणावर सायबर चोरट्यांच्या थापांना बळी पडत आहेत. सायबर चोरटे विविध कृल्प्त्या वापरून नागरिकांची अॅानलाइन पद्धतीने आर्थिक फसवणूक करीत आहेत. सध्या मात्र, सायबर सोरट्यांनी नवा ट्रेन्ड आला आहे. तो म्हणजे ‘डिजिटल अॅरेस्टचा’. या कारवाईच्या भीतीपोटी नागरिकांना लाखो रुपये अॅानलाइन पद्धतीने पाठवण्यासाठी भाग पाडले जात आहे. या प्रकरणी सायबर पोलीस देखील आता सतर्क झाले असून, सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान त्यांच्या पुढे उभे ठाकले आहे.
वर्षभरात १३६ कोटींचा गंडा
पुण्यात वर्षभरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली असून त्याची आकडेवारी समोर आली आहे. तब्बल १३६ कोटीहून अधिक रुपयांची फसणूक झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आले आहे. वर्षभरात १३६ कोटी ७३ लाख ६६ हजार ४१९ रुपयांची नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. पुणे पोलिसांना सायबर फसवणूकीच्या १४० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ७४ लाख २७ हजार २९२ रुपयांची वसूली करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
पोलिसांसमोर सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान
शहरात गुन्हेगारी वाढत असताना आता सायबर क्राईमच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. सायबर चोरट्यांकडून वर्षभरात डेबिट, क्रेडिट कार्ड हॅक करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. तर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून १ कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे. अशा सायबर चोरट्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर असली तरी भविष्यात अशा प्रकारे आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे.





