Pune Crime: “शस्त्र बाळगण्यास तुम्ही अयोग्य!”; पूजा खेडकरच्या आईचा पिस्तूल परवाना अखेर रद्द

प्रभात वृत्तसेवा
पुणे – बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. मुळशी तालुक्यातील धडवली गावात एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचा प्रकारणी मनोरमा यांच्यासह सात जणांविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शिवाय मनोरमा यांच्यावर नवी मुंबईतील रबाळेआणि पुण्यातील चतुःश्रृंगी ठाण्यातही विविध कलमानुसार गुन्हे आहेत. यामुळे पुणे पोलिसांनी त्यांना शस्त्र परवाना रद्द का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर काहीही खुलासा दिला नाही. काही दिवसांपूर्वी मनोरमा यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन जीवाला धोका असल्याचा दावा करत लेखी खुलासा सादर केला.
मात्र तो पोलिसांना समाधानकारक वाटला नाही. जबाबात मनोरमा यांनी, माझ्या जीवाला धोका असून त्यास पोलिस आयुक्त जबाबदार असतील, असे गंभीर विधान केले होते. इतकेच नव्हे तर २६ जानेवारी रोजी संचलनाच्या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
विशेष म्हणजे, आयुक्तालयात म्हणणे मांडण्यासाठी आल्या तेव्हा कॅमेरे, समर्थकांच्या फौजफाट्यासह त्या आल्या होत्या.पोलिस आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे की,मनोरमा यांचे वर्तन गुन्हेगारी प्रवृत्तीचे व कायद्या मोडणारे आहे. भविष्यात मंजूर शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता असून, त्या शस्त्र परवाना धारण करण्यास योग्य व्यक्ती नाहीत. यामुळे शस्त्र परवाना तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.





