Pune Crime | सायबर गुन्हेगारांचा नवा ट्रॅप ; ईडी कारवाईचा बनाव करून ज्येष्ठ महिलेला ३२ लाखांचा गंडा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सक्त वसुली संचलनालय (ईडी) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाखांना फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादींशी मोबाइलवर सायबर चोरट्यांनी फेब्रुवारीमध्ये संपर्क साधला. त्यांच्या नावाने एका कंपनीची नोंदणी झाली असून त्यांच्या नावाचा गैरवापर करुन (आयडेंटीटी थेफ्ट) एका बँकेत खाते उघडले आहे. त्या खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार झाला असून याप्रकरणी ईडी आपल्याविरुद्ध कारवाई करणार आहे, अशी भीती सायबर चोरट्यांनी दाखविली.
त्यानंतर महिलेच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगून गोपनीय माहिती घेतली. कारवाई टालण्यासाठी तातडीने पैसे जमावे करावे लागतील,असे सांगून चोरट्यांनी ऑनलाइन पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात गेल्या सात महिन्यात वेळोवेळी ३२ लाख सहा हजार जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास करत आहेत.




