प्रभात वृत्तसेवा पुणे – महिला व्यावसायिकाला धमकावून ४५ लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळवून परदेशात गेलेल्या घायवळविरुद्ध कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल झाले आहेत. घायवळविरुद्ध आतापर्यंत वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांत मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड गोळीबार, बांधकाम व्यावसायिकाला धमकावून सदनिकांचा ताबा घेणे, तसेच महिला व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. घायवळच्या संपत्तीबाबत पुणे पोलिसांकडून तपास सुरू असून, पुणे पोलिसांकडून अंमलबजावणी संचानालयाशी (ईडी) पत्रव्यवहार करण्यात आला आहे. घायवळ सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवून तो परदेशात गेल्याचे उघडकीस आले असून, त्याच्या प्रत्यार्पणासाठी पोलिसांनी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. घायवळ टोळीने धाराशिव, अहिल्यानगर, बीड, सातारा, पुणे जिल्ह्यांत दहशत निर्माण केली आहे. घायवळ टोळीने जमीन बळाकविण्याचे गुन्हे करून बेकायदा मार्गाने संपत्ती जमा केली आहे. घायवळचा भाऊ सचिनविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड भागात नव्याने बांधलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी सचिन, नीलेश घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. शाळेतील उपाहारगृहासाठी खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या एका महिलेला धमकावून तिच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी घायवळ याच्यासह त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.