Pune Crime : गर्भलिंग निदान रॅकेटचा मास्टरमाईंड एकच! पुणे, अहिल्यानगर आणि यवत प्रकरणांचे धागेदोरे उघड
Pune Crime : राहाता, शिरूर-वाघोली आणि यवतमध्ये गर्भलिंग निदानाचे समान पॅटर्न; नरेंद्र साहेबराव ठाकरेच्या अटकेनंतर मोठे नेटवर्क उघड.

Pune Crime – अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, पुणे जिल्ह्यातील शिरूर-वाघोली आणि नुकत्याच उघडकीस आलेल्या यवत येथील गर्भलिंग निदान प्रकरणांमागे एकच सूत्रधार कार्यरत असल्याची धक्कादायक शक्यता तपासातून समोर येत आहे. नरेंद्र साहेबराव ठाकरे या संशयित एजंटचे नाव तिन्ही प्रकरणांत पुढे आल्याने राज्यभर पसरलेल्या गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे एकमेकांशी जोडले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
मार्च २०२६ मध्ये पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने शिरूर तालुक्यातील डोकसावंगी येथे कारवाई करून नरेंद्र ठाकरेला अटक केली होती. त्याच्याकडून जप्त केलेले साहित्य, आर्थिक व्यवहार, विविध जिल्ह्यांतील संपर्क आणि पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रांच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली. यवत प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरीने वापरलेले पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र ठाकरेकडून मिळाल्याचेही तपासात उघड झाले आहे.
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एजंटांमार्फत गर्भवती महिलांशी संपर्क साधणे, पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रांद्वारे तपासणी करणे, तपासणीची ठिकाणे सतत बदलणे आणि मोठ्या रकमांच्या मोबदल्यात गर्भलिंगाची माहिती देणे, हे समान धागे समोर आले आहेत. काही ठिकाणी वाहनांमधून फिरती क्लिनिक उभारली होती, तर अलीकडच्या काळात ही यंत्रणा थेट गर्भवती महिलांच्या घरी पोहोचवल्याचाही उलगडा झाला आहे.
दरम्यान, यवत प्रकरणात गेल्या अडीच वर्षांत हजाराहून अधिक गर्भलिंग चाचण्या झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या रॅकेटचे जाळे केवळ पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित नसून राज्यव्यापी असल्याची शक्यता बळावली आहे. पोलिसांनी आता महिलांना बेकायदा गर्भपातासाठी पाठविणाऱ्या साखळीचाही तपास सुरू केला आहे.
तर मार्चमध्येच पर्दाफाश
मार्च महिन्यातील कारवाईनंतर संपूर्ण नेटवर्कचा वेळीच पर्दाफाश झाला असता, तर यवतसारखे मोठे प्रकरण आधीच उघड झाले असते, तर अनेक स्त्रीभ्रूणांचे जीव वाचले असते, अशी चर्चा तपास वर्तुळात सुरू आहे. या अमानवी रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, सहभागी डॉक्टर, एजंटांसह गर्भपात केंद्रांपर्यंत पोहोचणे हे तपास यंत्रणांसमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरले आहे.






