Illegal Gender Determination Racket : फक्त १२ वी पास अन् करायचा सोनोग्राफी! केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश
Illegal Gender Determination Racket : पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांची पत्रकार परिषदेत माहिती; आरोपी गिरी आणखी दोन जिल्ह्यांत सक्रिय असल्याचा संशय, पोलिसांची पथके रवाना.

Illegal Gender Determination Racket – सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, डॉक्टरसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते. अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड, मूळ रा. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला २० मे रोजी अटक केली आहे, तर डॉक्टर अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (रा. उरुळीकांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी यवत पोलिसांनी केडगाव परिसरात गर्भलिंग निदान प्रकरणात कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. फिर्यादी डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांना १७ मे रोजी एकाने महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओच्या आधारे १९ मे रोजी यवत पोलिसांत त्यांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी अण्णासाहेब गिरीने नरेंद्र ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशिन घेतल्याचे निष्पन्न झाले.
मुख्य आरोपी गिरीला अटक केल्यानंतर गुन्ह्यात अतुल जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार माळी (रा. किकवी, ता. भोर) सुंदरम कदम (रा. उरुळीकांचन) यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेल्या व्हिडिओंची पडताळणी केल्यानंतर आरोपी गिरीने स्वतः गर्भलिंग निदान करत असल्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाइल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देशमुख यांनी केली.
आरोपी फक्त बारावी पास
आरोपी गिरी हा केवळ बारावी पास असून, त्याने बी. फार्मसीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, ते शिक्षण त्याने पूर्ण केले नाही. त्यानंतर त्याने एका आयुर्वेदिक डॉक्टरसाठी एमआर म्हणून काम पाहिले. या सगळ्या अनुभवाच्या जोरावर आरोपीने महिलांची अवैधरीत्या गर्भलिंग निदानाची तपासणी सुरू केली. गिरीने आणखी दोन जिल्ह्यांत अशाच प्रकारे गर्भलिंग निदान तपासणी केली आहे. त्याअनुषंगाने तपास केला जात आहे.
“केडगाव परिसरात गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, तांत्रिक तपासात आरोपी हा १२ ते १५ डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गुन्ह्याची पाळेमुळे खोदून काढली जाणार आहेत.”
– संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण






