Pune Crime : पुण्यात दोन बड्या बिल्डरांमध्ये जुंपली! बांधकाम साइटवर डंपर-ट्रॅक्टर घुसवले; ४० जणांवर गुन्हा
Pune Crime : वडगावशेरीतील ४० गुंठे जागेवरून दोन बांधकाम व्यावसायिकात राडा; १० ट्रॅक्टर आणि डंपरसह बांधकाम साइटवर जबरदस्तीने घुसखोरी.

Pune Crime – वडगावशेरीतील कोट्यवधी रुपयांच्या जागेच्या वादातून दोन बांधकाम व्यवसायीकांत मोठा वाद उफाळून आला. यातील एका बांधकाम व्यवसायीकाने बांधकाम सुरू असलेल्या साइटवर जबरदस्तीने घुसखोरी करीत गेटची तोडफोड केली. वाहने आत घातली तसेच वॉचमनला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,
बांधकाम व्यावसायिक रविंद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार बांधकाम व्यवसायीक अमित लुंकड तसेच राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर आणि ३० ते ४० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुगड ग्रुपच्या माध्यमातून रविंद्र दुगड हे बांधकाम व्यवसाय करतात. मौजे वडगावशेरी येथील सर्व्हे नंबर ३० मधील सुमारे ४० गुंठे जागा पूर्वी विविध व्यवहारांद्वारे विकत घेतली होती.
त्यापैकी ३१ गुंठे जागा २०२३ मध्ये सुमित राठोड यांच्याकडून दुगड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपीच्या नावे खरेदी करण्यात आली. जागा खरेदी केल्यानंतर सर्व परवानग्या घेऊन मागील दोन महिन्यांपासून साइटवर बांधकाम सुरू होते. दरम्यान, गुरूवारी (७ मे) सायंकाळी ०५:३० च्या सुमारास लुंकड यांच्यासह ३० ते ४० जण १० ट्रॅक्टर, डंपर आणि वॉटर टँकर घेऊन साइटवर आले, त्यांनी साईटचे आत वाहने घुसवली तसेच वॉचमनला मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच रविंद्र दुगड आणि त्यांचा मुलगा ऋषभ दुगड घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी काही जणांनी हा प्लॉट आमचा आहे, इथून निघून जा, नाहीतर जीवे मारू, अशी धमकी दिली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद पवार यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर आरोपी निघून गेले. अमित लुंकड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.
“सदर जागे संदर्भात लुंकड यांच्याशी आमचा कधीही कोणताही संबंध आलेला नाही. मात्र, तरीही ते आम्हाला त्रास देत आहेत. घटना घडली त्यावेळी सुदैवाने बांधकाम साइटवर तातडीने येत पोलिसांनी दखल घेतली.”
– रविंद्र दुगड, फिर्यादी, बांधकाम व्यवसायीक
“जागेसंदर्भातील वाद असतील तर त्याचा कायदेशी प्रक्रिया राबवून ताबा घेणे आवश्यक आहे. याप्रकारे ताबा घेता येत नाही. यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला आहे.”
– गोविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस ठाणे






