Pune Crime : ‘स्वस्त सोन्याच्या’ आमिषाने दीड कोटींची फसवणूक; फरार दाम्पत्याला अटक
मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडियाच्या मदतीने आरोपी देशातील विविध राज्यांत फिरत असल्याचे समोर आले.

पुणे : शहरातील धनकवडी-कात्रज परिसरात स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची तब्बल दीड कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या फरार पती-पत्नीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई अत्यंत कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे करण्यात आली असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून आरोपी हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५) व त्यांची पत्नी रुपाली हेमंत खरोटे (वय ३८) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही ‘अवनी ज्वेलर्स’ या नावाने धनकवडी परिसरात व्यवसाय करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २०१६ ते २०२६ या कालावधीत नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवले. ‘प्रती तोळा सुमारे ६० हजार रुपये दर’ आणि ‘मेकींग चार्जेस नाहीत’ असे सांगून त्यांनी अनेकांकडून गुंतवणूक करून घेतली.
सुरुवातीला थोडे सोने देऊन विश्वास संपादन करण्यात आला, त्यानंतर मोबाईलवर दागिन्यांचे फोटो दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. मात्र नंतर ना सोने दिले ना पैसे परत केले.
मुख्य फिर्यादी अंजली निंबाळकर यांच्याकडून सुमारे १ कोटी ४९ लाख ९५ हजार ५०० रुपये घेण्यात आले. त्यापैकी काही रक्कम परत केली असली तरी सुमारे १ कोटी ३४ लाख ८२ हजार ५०० रुपये परत न करता फसवणूक केल्याचे उघड झाले. याशिवाय इतरही नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले असून एकूण रक्कम दीड कोटींच्या पुढे गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी आपले घर, दुकान आणि मोबाईल बंद करून पुण्यातून पलायन केले होते. त्यांच्याकडे तब्बल ९ मोबाईल फोन व १२ सिमकार्ड असल्याचे निष्पन्न झाले. ते सतत मोबाईल बदलून वापरत असल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते.
तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडियाच्या मदतीने आरोपी देशातील विविध राज्यांत फिरत असल्याचे समोर आले. दरम्यान, ते ओला कॅबने प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चालकांच्या मोबाईल क्रमांकांचा व प्रवासाच्या मार्गांचा अभ्यास केला. त्यानुसार सापळा रचून मुंबई-पुणे मार्गावर दोघांना अटक करण्यात आली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.






