Pune Crime Review 2025: गुन्हे घटले पण दहशत कायम; पोलिसांचा २०२५ चा धक्कादायक रिपोर्ट समोर..वाचा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे शहरात गेल्या एका वर्षात तब्बल ७९ खून, १५३ खूनाचे प्रयत्न आणि १४५३ गंभीर दुखापतीच्या घटना घडल्या आहेत. २०२४ च्या तुलनेत या गुन्ह्यांमध्ये १४ ते १५ टक्क्यांची घट झाली असली, तरी गुन्ह्यांची क्रूरता आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम मात्र चिंताजनक आहे.पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित वार्षिक गुन्हे आढावा २०२५ या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, मनोज पाटील, राजेश बनसोडे यांची उपस्थिती होती.आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, की पोर्शे कार अपघात प्रकरणात सुरुवातीला पुणे पोलिसांवर समाजातून टीका झाली होती. मात्र, पोलीस दलाने कार्यक्षमतेने तपास करत पीडितांना न्याय मिळवून दिला.
आज १९ महिन्यांनंतरही आरोपींना जामीन मिळालेला नाही. वर्षभरात काही टोळीप्रमुखांकडून गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या. मात्र, पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या आर्थिक स्रोतांवर घाव घातला, मालमत्ता जप्त केली आणि बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्र जप्त करण्यात आली असून, शस्त्र खरेदीचे स्रोत शोधून काढले आहेत.
उमरटी येथे झालेल्या कारवाईचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतील. आगामी काळात आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबवून घरझडतीही घेतली जाणार आहे. अंमली पदार्थांविरोधातही वर्षभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
सोनसाखळी चोरांचा कहर
मागील तीन वर्षांच्या तुलनेत सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली असून, उपनगरांमध्ये या घटना अधिक घडत आहेत. सोनसाखळी चोरीसाठी स्वतंत्र कलम लागू केल्यामुळे ही आकडेवारी वाढलेली दिसत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पब- बार पोलिसांच्या रडारवर
पब आणि बार संस्कृतीबाबत नागरिकांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेऊन नियमभंग रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. सोसायट्या आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून तक्रार येताच तात्काळ कारवाई केली जात आहे. विमाननगर येथील विनापरवाना सुरू असलेल्या बारवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून, त्या प्रकरणात पोलीस उपायुक्तांनाही स्वतंत्र तपासाचे आदेश दिले आहेत.





