प्रभात वृत्तसेवा पुणे – विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करुन तिची समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागितली आहे.आरोपीने महिलेला धमकावून तिच्याकडून एक लाख २२ हजार रुपये घेतले. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी वीरेन धीरजकुमार रणशृंगारे ( ३३, रा. बुधवार पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ३१ वर्षीय महिला आणि रणशृंगारेची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. महिलेला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. आरोपीने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने टाळाटाळ केली.आरोपीने महिलेची मोबाइलवरुन छायाचित्रे काढली, तसेच चित्रफीत तयार केली. छायाचित्रे, चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन महिलेकडून एक लाख २२ हजार रुपये घेतले. त्यानंतर छायाचित्रे, चित्रफीत महिलेची बहीण आणि तिच्या पतीला दाखविली. छायाचित्रे, चित्रफीत प्रसारित केल्यास समाजात बदनामी होईल. हा विषय संपवून टाकतो. दहा लाख रुपये द्या, अशी धमकी त्यांना दिली. अखेर घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.