Pune News : पुण्यात ‘किडनॅपिंग ड्रामा’; प्रेयसीसीला पैसे देण्यासाठी तरुणाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव
Pune News : प्रेयसीसाठी दीड लाख अन् खर्चासाठी पैसे हवे असल्याने १९ वर्षीय तरुणाने भावाकडून ५ लाख उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला.

Pune News : प्रेयसीला देण्यासाठी दीड लाख रुपये आणि स्वतःच्या खर्चासाठी पैसे हवे असल्याने १९ वर्षीय तरुणाने थेट स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. मोठ्या भावाकडून तब्बल पाच लाख रुपये उकळण्यासाठी त्याने आपण अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असल्याचे भासवले. (Pune News)
कुटुंबीयांचा विश्वास बसावा यासाठी ढसाढसा रडतानाचे व्हिडिओही त्याने पाठवले. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत या ‘किडनॅपिंग ड्रामा’चा पर्दाफाश केला. खडकीतील क्राउन प्लाझा लॉजिंगमध्ये अपहरणकर्त्यांऐवजी स्वतः तरुणच पोलिसांना सापडला. (Pune News)
ओम प्रकाश गौरीशंकर ( १९, रा. बांदा, उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. तो अग्निवीर भरतीच्या वैद्यकीय चाचणीसाठी पुण्यात आला होता. पुण्यात आल्यानंतर त्याला प्रेयसीला देण्यासाठी दीड लाख रुपये तसेच स्वतःच्या खर्चासाठी पैशांची गरज होती. मात्र, एवढी रक्कम स्वतःकडे नसल्याने त्याने मोठ्या भावाकडून पैसे उकळण्याचा कट रचला. (Pune News)
भावाला केला ‘किडनॅप’चा फोन
गौरीशंकरने आपल्या कुटुंबीयांना आणि भावाला आपण पुण्यात अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. आपली सुखरूप सुटका हवी असल्यास पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणीही त्याने केली. कुटुंबीयांना संशय येऊ नये म्हणून त्याने रडतानाचे व्हिडिओ तयार करून पाठवले. (Pune News)
व्हिडिओमध्ये तो घाबरलेला असल्याचे भासवत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याच्या अपहरणाची माहिती खरी मानली. मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पुण्यात त्याचे अपहरण झाले असून, अपहरणकर्ते पाच लाख रुपयांची मागणी करत असल्याची माहिती शाहजहांपुर पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली. माहिती मिळताच पुणे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. (Pune News)
मध्यरात्रीपासून पुणे पोलिसांची शोधमोहीम
गंभीर स्वरूपाचे अपहरण असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी गौरीशंकरचा शोध घेत होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे बंडगार्डन पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. (Pune News)
मोबाईलचे लोकेशन खडकी परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी खडकीकडे धाव घेतली. गौरीशंकरच्या मोबाईलचे लोकेशन तपासत पोलिसांनी खडकीतील क्राउन प्लाझा लॉजिंग गाठले. तेथे पोलिसांना कोणतेही अपहरणकर्ते आढळले नाहीत. उलट, ज्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती, तोच गौरीशंकर लॉजमध्ये आढळून आला. (Pune News)
रात्रगस्त पथकाने उघडकीस आणला बनाव
या कारवाईत बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या रात्रगस्त पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, सहायक उपनिरीक्षक प्रवीण शितोळे, पोलीस हवालदार प्रकाश आव्हाड, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, माऊली गायकवाड आणि महेश जाधव यांनी सहभाग घेतला. (Pune News)





