Pune Crime: येरवडा कारागृहात कात्रीने भोसकून कैद्याचा खून

पुणे – येरवडा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी दुपारी एका कैद्याचा कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी चौघा कैद्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दरम्यान या घटनेने खळबळ माजली असून कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ललित पाटील प्रकरणामुळे येरवडा कारागृह मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिण्यापुर्वीच एका कैद्याने नाडीने गळफास घेत आत्महत्या केली होती.
महेश महादेव चंदनशिवे (रा.चिखली, पुणे) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी बंदी असलेले अनिकेत श्रीकृष्ण समदुर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी भुरे, गणेश हनुमंत मोटे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम येरवडा कारागृहात सुरु होते. दरम्यान चंदनशिवे याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यावर तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चंदनशिवेविरुध्द पिंपरी पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी आणि आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तो 30 नोव्हेंबर 2022 पासून कारागृहात शिक्षा भोगत होता. गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सर्कल नंबर 2 मधील बराक नंबर एकमध्ये आरोपींनी त्याला गाठले. त्याच्यावर कैची (कात्री) आणि दरवाजाच्या बीजागरीच्या तुकड्याने मानेवर आणि पोटावर वार केले. गंभीर जखमी चंदनशिवेला कारागृहातील रक्षकांनी तातडीने कारागृह रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करुन ससून रुग्णालयात पाठवले. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.





